बाजार समिती पदाधिकारी निवडीकडे लक्ष
By Admin | Updated: July 7, 2016 02:37 IST2016-07-07T02:37:30+5:302016-07-07T02:37:30+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा १० जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

बाजार समिती पदाधिकारी निवडीकडे लक्ष
रविवारी सभा : कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाचे निर्विवाद वर्चस्व
कळंब : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा १० जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संस्थेवर राष्ट्रवादी-भाजपा युतीने १८ पैकी १५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रा.वसंत पुरके गटाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता सर्वात मोठा गट असलेल्या भाजपा-राष्ट्रवादीच्या गटातून पदाधिकारी होणे निश्चित आहे. या संस्थेचे संचालक प्रवीण देशमुख यांनी यापूर्वी सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यामुळे आताही त्यांनीच सभापतिपद भुषवावे, अशी बहुतांश नवनिर्वाचित संचालकांची इच्छा आहे.
त्यांनी स्वत: सभापती होणार नाही, अशी भूमिका घेतली तरच नवीन चेहरा सभापतिपदी दिसेल. अन्यथा प्रवीण देशमुख हेच सभापतिपदी विराजमान होतील, हे निश्चित मानले जाते.
सर्वांत महत्वाचे म्हणजे सभापतीपेक्षा उपसभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपाची युती होती. भाजपाचे चार संचालक निर्वाचित झाले. राष्ट्रवादीचा सभापती झाल्यानंतर भाजपाच्या गटाला उपसभापतिपद दिले जाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपातून उपसभापती पदावर विवेक अंदुरकर अथवा पवन कदम यांच्यातून एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शेवटी आमदार डॉ.अशोक उईके कोणाच्या गळ्यात उपसभापतीची माळ घालतात यालाच अधिक महत्त्व राहणार आहे. येणाऱ्या काळात सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाला पाय रोवण्याच्यादृष्टीने विचार करावयाचा झाल्यास डोंगरखर्डा येथील सरपंच निश्चल ठाकरे यांनाही उपसभापती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)