हल्लाबोल आंदोलन
By Admin | Updated: August 16, 2014 23:43 IST2014-08-16T23:43:18+5:302014-08-16T23:43:18+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी

हल्लाबोल आंदोलन
‘गाव तेथे उपोषण’ : शेतकऱ्यांचा एकमुखी ठराव
पांढरकवडा : विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी केले.
दुपारी १ वाजता येथील शिवाजी पुतळ्याजवळून केळापूर, घाटंजी, आर्णी, वणी, मारेगाव, राळेगाव, झरी आदी तालुक्यातून आलेले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला-पुरुष तहसील कार्यालयात धडकले. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. येत्या २० दिवसात सरकारने मागण्या मान्य न केल्यास ‘गाव तेथे उपोषणा’चा ठराव यावेळी घेण्यात आला.
सभेला संबोधित करताना किशोर तिवारी म्हणाले, आमचा लढा शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासींच्या सुखासाठी आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. विविध प्रश्नांनी भीषण रूप धारण केले असताना या सर्व प्रश्नांकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि हक्काच्या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी रस्त्यावर उतरले आहे. आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. म्हणून आमचे आंदोलन, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील. राजकारणी लोकांनाही आता धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
सभेप्रसंगी अनिल तिवारी, मोहन मामीडवार, मोरेश्वर वातीले, मुबारक तंवर, ताराबाई पाटील आदींनीही मार्गदर्शन केले. सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे निवेदन घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी संदीप महाजन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मोहन जाधव, अंकित नैताम, मनोज मेश्राम, सुरेश बोलेनवार, प्रीतम ठाकूर, भीमराव नैताम, नंदकिशोर जयस्वाल, शेखर जोशी आदींनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)