छेड काढणाऱ्या टोळक्याचा एसटी बस चालकावर हल्ला
By Admin | Updated: September 29, 2014 00:51 IST2014-09-29T00:51:25+5:302014-09-29T00:51:25+5:30
एसटी बसमधून प्रवास करताना मुलींची छेड काढणाऱ्या एका टोळक्याने चक्क बसचालकावरच हल्ला केला. यात बसचालक जखमी झाला. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.

छेड काढणाऱ्या टोळक्याचा एसटी बस चालकावर हल्ला
बाभूळगाव : एसटी बसमधून प्रवास करताना मुलींची छेड काढणाऱ्या एका टोळक्याने चक्क बसचालकावरच हल्ला केला. यात बसचालक जखमी झाला. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. ही घटना यवतमाळ-धामणगाव बसमध्ये शनिवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.
राज्य परिवहन महामंडळाची यवतमाळ-धामणगाव बस शनिवारी रात्री धामणगावकडे निघाली. या बसमध्ये ३५ प्रवासी बसलेले होते. त्यातील १५ जणांच्या टोळक्याने शिट्या वाजविणे, गाणे वाजविणे, मोठमोठ्याने ओरडणे असा विचित्र प्रकार सुरू केला. काही तरुणींनी याची तक्रार वाहक आणि चालकाकडे केली. त्यामुळे काही क्षणासाठी हा गोंधळ थांबला. परंतु पुन्हा काही वेळातच या तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सांगूनही हे टोळके ऐकत नव्हते. तेवढ्यात दत्तापूर (धामणगाव) आले. प्रवासी बसमधून खाली उतरत असताना या १५ तरुणांनी बसचालक अमोल उखाडे (३५) रा.फाळेगाव याच्यासोबत वाद घातला. टोळक्याने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात उखाडे गंभीर जखमी झाला. त्यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी १५ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोन तरुणांना नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात आली. वृषभ बावणे व सोमेश गिलाणी असे अटकेतील तरुणांचे नाव आहे. (प्रतिनिधी)