पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापले
By Admin | Updated: November 9, 2016 00:34 IST2016-11-09T00:34:55+5:302016-11-09T00:34:55+5:30
येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीने थंडीतही वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात हॅट्ट्रिक

पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापले
हॅट्ट्रिक साधण्यासाठी दोघे रिंगणात : निवडणुकीत चौथ्यांदा तिघेजण अजमावित आहेत भाग्य
पुसद : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीने थंडीतही वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात हॅट्ट्रिक साधण्यासाठी दोघे जण तर सलग चौथ्यांदा तिघेजण भाग्य आजमावित आहेत. दरम्यान सलग सहा वेळा सदस्य राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीताबाई कांबळे यावेळी निवडणुकीतून बाहेर आहेत.
या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचा, जनहितासाठी कष्ट करणाऱ्या उमेदवारास निवडण्याची नागरिकांची मानसिकता दिसून येत आहे. यावेळी हॅट्रीक साधलेले तर काही जण हॅट्रिक साधण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम यांची निवडणूक लढविण्याची चौथी वेळ आहे ते तीन वेळा निवडून आले आहेत. डॉ. अकील मेमन हॅट्रीक साधण्यासाठी उभे आहेत. राष्ट्रवादीचे राजू दुधे यांची ही चौथी टर्म आहे. तीन वेळा निवडून आले आहे.
राष्ट्रवादीतून भाजपा तर गेलेले नगरसेवक निरज पवार चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. शिवसेनेचे अॅड़ उमाकांत पापीनवार हॅट्रिक साधण्यासाठी तिसऱ्यांदा उभे आहेत. अॅड़ भारत जाधव, अजय पुरोहित, दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. १९८५ पासून नगरसेवक होण्याचा मान सीताबाई कांबळे यांना मिळाला् त्यानंतर सलग सहाही निवडणुकीत त्या विजयी झाल्यात. सहा टर्ममध्ये त्यांनी साडे तीन वर्षे नगराध्यक्षपद विभूषित केले. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण सभापती, आरोग्य सभापतीपदही विभूषित केले आहे. पक्षासाठी काम करायचे आहे, अशी भूमिका घेत त्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला नसावा अशी चर्चा होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षासह १५ महिला जाणार नगरपरिषदेत
पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले असून नगराध्यक्षासह १५ महिला नगरपरिषदेत जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेत महिलाराज येणार आहे. पुसद नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. १४ प्रभागातून २९ नगरसेवक निवडून जाणार आहे. यंदा नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. तर २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या नगरपरिषदेत १६ महिला पोहोचणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अनिताताई मनोहरराव नाईक, भाजपा-सेनेच्या डॉ. अर्चना अश्विनी जयस्वाल, काँग्रेसच्या शुभांगी प्रकाश पानपट्टे रिंगणात आहे. राज्याचे ज्येष्ठमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांच्या सुविद्य पत्नी रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते डॉ. मोहंमद नदीम, डॉ. वजाहत मिर्झा, अॅड. सचिन नाईक यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरत आहे. एकंदरित पुसद नगरपरिषदेत नगराध्यक्षाची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगत आणणार आहे.