एटीआय व यांत्रिकांची स्टेअरिंगवर एन्ट्रीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST2022-02-07T05:00:00+5:302022-02-07T05:00:07+5:30
सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभागात नाममात्र वाहतूक निरीक्षक कामगिरीवर पाठविले जात आहे. तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची सेवाही घेण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची माहिती आहे.

एटीआय व यांत्रिकांची स्टेअरिंगवर एन्ट्रीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चालक नसल्यामुळे एसटीच्या बसफेऱ्या वाढविता येत नाहीत, असे महामंडळाकडून सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे संपात सहभागी नसलेले यांत्रिक कर्मचारी आणि सहायक वाहतूक निरीक्षकांना चालक म्हणून पाठविण्याकडे यंत्रणेची चालढकल सुरू आहे. या सर्व प्रकारात अधिकाऱ्यांचा त्रास वाचविला जात असला तरी, प्रवासी वर्ग मात्र त्रस्त बनला आहे.
सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभागात नाममात्र वाहतूक निरीक्षक कामगिरीवर पाठविले जात आहे. तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची सेवाही घेण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची माहिती आहे.
यवतमाळ विभागात सध्या केवळ ११७ चालकांच्या भरवशावर बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. एक चालक जवळपासच्या गावांकरिता केवळ दोन फेऱ्या करून एसटी बस आगारात लावून देतो. सहायक वाहतूक निरीक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची कामगिरी लावल्यास निश्चितच बसफेऱ्या वाढतील, असे सांगितले जाते. मात्र, याची अंमलबजावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का केली जात नाही, हा प्रश्न आहे.
अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
- एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागात काही अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. उत्पन्न किती आले, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक कर्मचारी अशा किती कर्मचाऱ्यांची कामगिरी लावण्यात आली, याविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध राहत नाही. एकमेकांकडे बोट दाखविले जाते. तसा आजारच जणू यवतमाळ विभागाला जडला आहे. प्रजासत्ताकदिनी संपकरी कर्मचाऱ्यांना ध्वजवंदनास मज्जाव करण्यात आला. या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी बयान नोंदविले. त्यात आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांनी एकमेकांकडे बोट दाखविल्याचे बयानावरून स्पष्ट झाले. तूर्तास तरी हे प्रकरण थंड बस्त्यात आहे.
वाहतूक नियंत्रकांकडून केवळ स्पाॅट बुकिंग
वाहकांमधून वाहतूक नियंत्रक झालेले यवतमाळ विभागात २०० हून अधिक अधिकारी आहेत. त्यांची कामगिरी तिकीट बुकिंगसाठी लावण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकारी केवळ बसस्थानकावर बुकिंग करून एसटी बस रवाना करतात. मार्गात मिळणारे प्रवासी घेण्याची सोयच चालकाकडे राहत नाही. वाहतूक नियंत्रक पूर्णवेळ बसमध्ये राहिल्यास अनेक प्रवासी मिळतील, असे ठामपणे सांगितले जाते.