सातारा, सोलापूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान

By Admin | Updated: October 16, 2016 00:59 IST2016-10-16T00:59:43+5:302016-10-16T00:59:43+5:30

येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सातारा, सोलापूर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवित पदकांची लयलूट केली

Athletes of Satara, Solapur, Gajewal Ground | सातारा, सोलापूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान

सातारा, सोलापूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा : शुभांकरला सर्वाधिक गुण
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सातारा, सोलापूर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवित पदकांची लयलूट केली. देशात प्रथमच यवतमाळ येथे आयोजित नऊ वर्षाखालील चिमुकल्यांच्या धनुर्विद्या स्पर्धेत साताऱ्याच्या कनिष्ठ मोने, राज इंदे यांनी सुवर्ण पदक पटकाविले, तर रायगडच्या शुभांकर पाटीने सर्वाधिक ३३७ गुण पटकावून सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व यवतमाळ जिल्हा संघटना यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी स्पर्धेचा दुसरा दिवस ९ वर्षाखालील चिमुकल्यांनी गाजविला. देशात प्रथमच आयोजित या गटात राज्यातील तब्बल शंभर खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत सहभाग घेताना या चिमुकल्यांनी शिवाजी महाराज, मावळे, एकलव्य आदी विविध वेशभूषेत येऊन लक्ष्य भेद केला.
मुलींच्या ९ वर्ष गटातील इंडियन राऊंडमध्ये १५ मीटरच्या धनुर्विद्या प्रकारात सातारा जिल्ह्यातील कनिष्का मोने हिने ३०३ गुण प्राप्त करीत प्रथम स्थान पटकाविले. साताऱ्याच्याच समीक्षा चिट्टे हिने २६८ गुणांसह द्वितीय तर मुंबईच्या अनुरिता पेवेकर हिने २६३ गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. १५ मीटर रिकर्व्ह प्रकारात तन्वी बुंदेले (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. सोलापूरच्या गौरी ढवळेने रजत तर पिंपरी चिंचवडच्या आर्या बंब हिने कांस्य पटकाविले. ९ वर्ष (मुले) इंडियन राऊंड १५ मीटर प्रकारात राज इंदे (सातारा) ३१२ गुणांसह अव्वल स्थानी राहिला. पृथ्वीराज घाडगे (सोलापूर) ३०८ गुणांसह द्वितीय तर श्लोक भट्ट (मुंबई) याने २९५ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले. १५ मीटर रिकर्व्ह प्रकारात शुभांकर पाटीलने (रायगड) स्पर्धेत सर्वाधिक ३३७ गुण पटकावून सुवर्ण जिंकले. वेदांत दुधाने (पुणे) याने ३१२ गुणांसह रजत तर चिन्मय चुटेने (भंडारा) २३० गुण प्राप्त करीत कांस्य पदक पटकाविले.
रविवारी सकाळच्या सत्रात ९ वर्षाखालील मुलांच्या धनुर्विद्या स्पर्धा होतील. तसेच इंडियन राऊंड, रिकर्व्ह व कम्पाऊंड राऊंडमध्ये सांघिक व वैयक्तिक सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड केली जाणार आहे. बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता होईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Athletes of Satara, Solapur, Gajewal Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.