आमदाराची आमसभा महिलांनी गाजविली

By Admin | Updated: January 27, 2015 23:41 IST2015-01-27T23:41:02+5:302015-01-27T23:41:02+5:30

येथील पंचायत समिती सभागृहात मंगळवारी झालेली आमसभा चांगलीच वादळी ठरली. सभेत आमदार अशोक उईके यांच्याकडे महिलांनी तालुक्यातील अवैध धंदे व दारुबंदी करण्याची मागणी लावून धरली.

The assembly of the MLA convened by the women | आमदाराची आमसभा महिलांनी गाजविली

आमदाराची आमसभा महिलांनी गाजविली

काही काळ कामकाज रोखले : दारुसह अवैध धंदे बंद करण्याची मागणी
गजानन अक्कलवार - कळंब
येथील पंचायत समिती सभागृहात मंगळवारी झालेली आमसभा चांगलीच वादळी ठरली. सभेत आमदार अशोक उईके यांच्याकडे महिलांनी तालुक्यातील अवैध धंदे व दारुबंदी करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे सभेत एकच गोंधळ निर्माण झाला.
आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्या आमसभेत जनतेला थेट पहिल्यांदाच प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. त्यामुळे सभा ठिकाणी नागरिकांनी समस्या घेऊन मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे यात महिलांची अधिक संख्या होती. चिंचोली, टालेगाव परीसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दारु विक्रीला पोलिस कसे जाबबादार आहे, याची माहीती ते सभेत देत होते. ठाणेदार जोपर्यंत सभागृहात येऊन दारुबंदीचा ठोस आश्वासन देणार नाही, तोपर्यंत सभागृहाबाहेर पडणार नाही, असा निर्धार महिलांनी केला. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या ठाणेदाराला सभा ठिकाणी तात्काळ पोहचावे लागले. त्यानंतर महिलांनी हाच विषय ठाणेदारापुढे मांडत आपला रोष व्यक्त केला. येत्या आठ दिवसात दारुबंदी करण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदारांनी दिल्यानंतर महिला शांत झाल्या.
त्यानंतर सभेत अनेक विषयावर वादळी चर्चा झाली. सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्तीगत व सार्वजनिक प्रश्न विचारुन अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे लक्षात आल्यावर आमदारांनी संबधित अधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्ताकडे अहवाल पाठविण्याची सूचना केली. सभेत विशेष करून कळंबची नळ योजना, कळंब येथील उर्दु शाळेवरील शिक्षकांवर काय कारवाई झाली. कळंबच्या कन्या शाळेतील अनियमित प्रकार, शिक्षकांचे शाळेत वेळेवर न पोहचणे, कळंब येथील क्रिडासंकुलाचा विषय, घरकुलांचे प्रश्न, धडक सिंचन विहीर, तालुक्यातील रस्त्याची दूरवस्था आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कळंब तालुक्यात दारुबंदी करण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली. सभा रात्री उशीरापर्यंत सुरुच होती.
आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत चुकीची माहीती दिल्यावर अनेकदा गोंधळ निर्माण झाला होता. सभेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, निलीमा गोहणे, सुरेश चिंचोळकर, पंचायत समिती सदस्य किरण पवार, प्रल्हाद मांडवकर, विजय सुटे, तिलोत्तमा मडावी, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष आनंदराव जगताप, शशिकांत देशमुख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालु पाटील दरणे, उपाध्यक्ष सुदाम पवार, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता उमेश राऊत, शाखा अभियंता तुषार परळीकर, गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश देशमुख, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता शरद राघमवार, वनपरिक्षेत्राधिकारी आर.के. पटवारी आदीसह अनेक विभागाचे प्रमुख व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेत काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने ती हाताळली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The assembly of the MLA convened by the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.