वृद्धेचा लुगड्याने गळा आवळणारा मारेकरी गजाआड
By Admin | Updated: February 15, 2015 01:58 IST2015-02-15T01:58:19+5:302015-02-15T01:58:19+5:30
लुगड्याच्या पदराने गळा आवळून वृध्देला ठार मारण्याची घटना तालुक्यातील कापरा (किटा) येथे रविवारी उघडकीस आली होती.

वृद्धेचा लुगड्याने गळा आवळणारा मारेकरी गजाआड
यवतमाळ : लुगड्याच्या पदराने गळा आवळून वृध्देला ठार मारण्याची घटना तालुक्यातील कापरा (किटा) येथे रविवारी उघडकीस आली होती. अखेर आठ दिवसानंतर घटनेचा उलगडा हाऊन मारेकऱ्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
देवेंद्र मधुकर भरगडे (२५) रा. कापरा असे आरोपीचे नाव आहे. तर किसनाबाई किसन देवकर (७२)असे मृत वृध्देचे नाव आहे. कापरा येथील शाळेत शनिवारी रात्री सांस्कृतीक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पहाण्यासाठी किसनाबाई बाहेर पडली. दरम्यान रविवारी सकाळी घराजवळच तिचा मृतदेह आढळून आला होता.
घटनास्थळी कुठलाही पुरावा नसल्याने घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. घटनेचा कुणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने गोपनीय माहितीवरूनच या घटनेचा छडा लागू शकतो हे यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान धनरे यांनी हेरले. त्यांनी गावातून कोण बेपत्ता आहे, याची माहिती काढली. त्यामध्ये देवेंद्र भरगडे हा गावात नसल्याचे पुढे आले. शनिवारी देवेंद्र गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता देवेंद्रने पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. तसेच किसनाबाईच्या घरातील पैशाची पेटी उचलत असताना ती तेथे पोहोचली. तिने आपल्याला ओळखले आता गावभर आपला बोभाटा होईल, म्हणून लुगड्याने गळा आवळून तिला ठार केल्याचे त्याने पोलिसांपुढे उघड केले. (स्थानिक प्रतिनिधी)