कला, क्रीडा शिक्षकांचे धरणे

By Admin | Updated: May 30, 2017 01:20 IST2017-05-30T01:20:51+5:302017-05-30T01:20:51+5:30

कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणाच्या कमी करण्यात आलेल्या तासिका पूर्ववत कायम ठेवाव्या,..

Art and sports teachers | कला, क्रीडा शिक्षकांचे धरणे

कला, क्रीडा शिक्षकांचे धरणे

तासिका पूर्ववत ठेवा : आयुक्तांचे अन्यायकारक पत्र रद्द करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणाच्या कमी करण्यात आलेल्या तासिका पूर्ववत कायम ठेवाव्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सोमवारी येथे धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाच्या सचिवांकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती तसेच सहयोगी शिक्षक संघटनांच्या पुढाकाराने तिरंगा चौकात हे आंदोलन करण्यात आले. शिक्षण आयुक्तांनी २८ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रानुसार, पहिली ते आठव्या वर्गाच्या तासिकांचे फेरनियोजन करण्यात आले. त्यात कला व शारीरिक शिक्षण विषयाचा ५० टक्के कार्यभार कमी करण्यात आलेला आहे. तर कार्यानुभव विषयावा २५ टक्के कार्यभार कमी केला आहे. मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येकी ८ टक्के कार्यभारानुसार ४ तासिका देणे आवश्यक आहे. असे असताना ५० तासिकांवरून ४५ तासिका करून तिन्ही विषयांच्या कार्यभारात अन्यायकारक कपात करण्यात आली आहे. आता या विषयांच्या शिक्षकांना कोणता कार्यभार द्यावा, असा प्रश्न शालेय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
कला विषयातील रेखाकला, इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने ७ जानेवारी रोजी घेतला. असाच निर्णय शारीरिक शिक्षण विषयासाठीही आहे. त्यामुळे एकीकडे कला व शारीरिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले, तर दुसरीकडे या विषयांच्या तासिका कमी करण्याचा परस्परविसंगत निर्णय शासनाने का घेतला, असा प्रश्न आंदोलक शिक्षकांनी उपस्थित केला.
संबंधित शिक्षकांना, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी २८ एप्रिलचे आयुक्तांचे पत्र रद्द करावे, संचमान्यतेत विशेष शिक्षक स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावे, सोबतच कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणाच्या तासिका पूर्वीप्रमाणे कायम ठेवाव्या अशा मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात आनंद मेश्राम, बबलू राठोड, फिरोज खान पठाण, नीलेश तायडे, सुधीर कानतोडे, जितेंद्र सातपुते, सचिन भेंडे, सिद्धार्थ भगत, विनोद मडावी, प्रकाश भूमकाळे, के. जे. बारब्दे, संजय चव्हाण, एम. एम. मीर, राजू वनकर, सुधीर सोनोने, राहुल ढोणे, शशी कांबळे, प्रवीण जिरापुरे, अविनाश जोशी, संजय बट्टावार, मनोज येंडे, पियूष भुरचंडी, संजय यवतकर, अभिजित पवार, संजय सातारकर, मंशाराव सावळकर, विजय चांदेकर, दिलीप गजरे, विकास टोणे, प्रफुल्ल गावंडे, मुकुंद हामंद, जी. बी. बोरकर, श्रीकांत देशपांडे, नरेंद्र गौरकार, महेश ठाकरे आदींसह शेकडो शिक्षक सहभागी झाले.

Web Title: Art and sports teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.