कोरेगाव भीमाप्रकरणी सूत्रधारांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:58 IST2018-01-22T21:57:05+5:302018-01-22T21:58:30+5:30
कोरेगाव भीमा प्रकरणाचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

कोरेगाव भीमाप्रकरणी सूत्रधारांना अटक करा
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कोरेगाव भीमा प्रकरणाचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. तिरंगा चौकात धरणे आंदोलनादरम्यान राज्य शासनाच्या भूमिकेवर रोष व्यक्त करण्यात आला.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला घडलेल्या घटनेचे सूत्रधार संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे आहेत, असे आंदोलकांनी सांगितले. या सूत्रधारांच्या अटकेची मागणी वारंवार करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्यांना अटक होईल, असे सांगितले होते. मात्र अद्यापही त्यांना अटक झाली नाही. त्यामुळे सूत्रधारांच्या अटकेपर्यंत बहुजन क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा ५ फेब्रुवारीला सुरू होणार असून तो देशव्यापी राहणार आहे. यासंदर्भात ५ फेबु्रवारीला देशभरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनात विलास गायकवाड, शकील अहेमद, रावसाहेब घोंगडे, पुंजाराम हटकरे, मदन गाडे, धर्मशिला वाकोडे आदींचा समावेश होता.