टोर्इंगच्या मनमानीचा तत्काळ बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:43 IST2018-04-18T23:43:58+5:302018-04-18T23:43:58+5:30
पार्किंगची सोय केलेली नसताना वाहने टोर्इंग करून नेली जात आहे. शिकवणी वर्ग, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर उभी असलेली वाहने वाहतूक पोलीस पथक वाहनात टाकून घेऊन जाते.

टोर्इंगच्या मनमानीचा तत्काळ बंदोबस्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पार्किंगची सोय केलेली नसताना वाहने टोर्इंग करून नेली जात आहे. शिकवणी वर्ग, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर उभी असलेली वाहने वाहतूक पोलीस पथक वाहनात टाकून घेऊन जाते. यात नागरिकांना त्रास होण्यासोबतच वाहनाचेही नुकसान केले जात आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय जिल्ह्यात बोकाळलेली अवैध प्रवासी वाहतूक, कळंब चौक ते तायडेनगर परिसरात रात्री १२ वाजतानंतरही सुरू राहात असलेली दुकाने बंद करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहराच्या अनेक भागात नो पार्किंगचे फलक नाही. पार्किंग मर्यादा निश्चित केलेली नाही. काही भागातच अशा प्रकारच्या सूचना झळकतात. कोचिंग क्लासेस, संगणक केंद्र, टायपिंग सेंटर याठिकाणी अशा कुठल्याही सूचना लावलेल्या नाही. दाटीवाटीने ठेवलेली वाहनेही टोर्इंग करून नेली जातात. विचारणा केल्यास पार्किंगचे फलक लावणे आमचे काम नाही, असे उद्धट उत्तर दिले जाते. प्रामुख्याने दुचाकीस्वारांना याचा अधिक त्रास आहे. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्याच्या अगदी मधोमध उभी केली जात असताना त्याकडे कानाडोळा केला जातो.
कळंब चौक ते तायडेनगर परिसरात रात्री १२ नंतरही काही दुकाने सर्रास सुरू राहतात. काही ठिकाणी अवैध व्यवसाय होत असल्याची माहिती आहे. या भागाशी संबंधित आणि रात्रगस्तीवर असलेले पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आझाद मैदानातील जलतरण तलावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला जलतरण तलावाची जबाबदारी असलेले कर्मचारी जबाबदार आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना विदर्भ उपाध्यक्ष अमित जयस्वाल, श्याम वैष्णव, सचिन कोंढेकर, अजय ठाकूर, देशमुख, अॅड. बाविस्कर, राजेश गारूडे, शैलेश शर्मा, पुरुषोत्तम तामने, सागर रेमनगुंडे आदी उपस्थित होते.