आर्णीत अल्पसंख्यक समाजाच्या मुलींसाठी वसतिगृह होणार
By Admin | Updated: July 9, 2016 02:40 IST2016-07-09T02:40:47+5:302016-07-09T02:40:47+5:30
स्थानिक माहेर मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

आर्णीत अल्पसंख्यक समाजाच्या मुलींसाठी वसतिगृह होणार
ख्वाजा बेग : मुस्लिम विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
आर्णी : स्थानिक माहेर मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींसाठी वसतिगृहासाठी आठ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासाठी यवतमाळ-धामणगाव रोडवर जागा निश्चित करण्यात आली. या कार्याबद्दल आमदार ख्वाजा बेग यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिर्झा रफी अहमद बेग होते. यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, प्रख्यात कवी अजिम नवाज राही, सलिम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार ख्वाजा बेग म्हणाले, अल्पसंख्यक मुलीच्या वसतिगृहासाठी बराच संघर्ष करावा लागला. सच्चर समितीपासून विविध मुद्यांचा पाठपुरावा केल्यामुळे बराच अवधी लागला. परंतु कर्तव्य समजूनच ही जबाबदारी पार पाडली. यात सर्वांचे सहकार्य लाभले. वसतिगृहाच्या मंजुरीसाठी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले. सलिम चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास बाळगावा. मिर्झा रफी अहमद बेग यांनीही कठोर परिश्रम करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. आमदारांनी वसतिगृह मंजूर केल्याने मुलींना चांगले शिक्षण घेता येईल, असे ते म्हणाले.
शेख सैयद गफार शेख पटवारी, के.के. खान, अन्सार शेख, अब्रार बेग मिर्झा, सलिम कलीम खान, अमीन शेख, यासिन नागाणी, असिफ शेख, फिरोज मिर्झा, युनूस बेग, फारूक शेख, शमोद्दीन भाटी, नासिर भाटी, जावेद, कलिम खान, शौकत सेठ सोलंकी, शकी खाकरा, रवी नालमवार, हरिश कुडे, चिराग शाहा, दीपक बुटले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांचे आभार अन्सार शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)