आर्णीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: December 23, 2016 02:12 IST2016-12-23T02:12:16+5:302016-12-23T02:12:16+5:30
तालुक्यातील जवळा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

आर्णीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित
मूर्ती विटंबना : पोलीस अधीक्षकांची कारवाई
आर्णी : तालुक्यातील जवळा येथील मूर्ती विटंबना प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी ही कारवाई केली.
तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या मूर्तीला शेण फासण्यात आले होते. ही घटना २० डिसेंबरला रात्री उशिरा घडली होती. दुसऱ्या दिवशी ही बाब लक्षात येताच उपविभागीय अधिकारी नीलेश पांडे, ठाणेदार संजय खंदाडे, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके, सतीश वळवी आदींनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या सहकार्याने प्रकरण शांत केले होते.
यापूर्वीही जवळा येथे मूर्ती विटंबनेचे जवळपास चार प्रकरण घडले होते. कोणत्यातरी निवडणुकीपूर्वी विटंबनेचे असे प्रकार सातत्याने घडत आहे. अशा घटनांनी गावाची शांतता धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र २० डिसेंबरला घडलेल्या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत मोठा अनर्थ टाळला होता.
दरम्यान ही गंभीरबाब लक्षात येता पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आर्णी पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप सरडे, दिगांबर शेळके, मंगेश कंबाले यांच्याविरुद्ध मूर्ती संरक्षणासाठी समिती गठित न करणे, मूर्ती परिसरात सकाळ-सायंकाळ गस्त न करणे, मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना न करणे आदी ठपका ठेवला. यावरून या तिघांनाही निलंबित करण्यात आले. कर्तव्यातील हयगय या तीन कर्मचाऱ्यांंना भोवली आहे. (तालुका प्रतिनिधी)