आर्णीला गारपिटीने झोडपले

By Admin | Updated: March 13, 2015 02:26 IST2015-03-13T02:26:22+5:302015-03-13T02:26:22+5:30

तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार वादळासह गारांचा पाऊस कोसळला. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. तर फळबागा जमीनदोस्त झाल्या आहे.

Arni blared hail | आर्णीला गारपिटीने झोडपले

आर्णीला गारपिटीने झोडपले

आर्णी : तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार वादळासह गारांचा पाऊस कोसळला. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. तर फळबागा जमीनदोस्त झाल्या आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे.
वादळाच्या तडाख्यात रबीतील गहू, हरभरा ही पिके जवळपास नष्ट झाली आहे. या शिवाय उन्हाळी भूईमूगालाही मोठा फटका बसला आहे. जवळा परिसरातील किन्ही, ब्राह्मणवाडा, पारधी तांडा, हरलाल हेटी, खंडाळा, शिरपूर, चांदणी, गौणा, जांब, शेलू, जांब चांदापूर, नवनगर येथे सर्वाधिक हानी झाली आहे. शेतातील संत्रा, पपई, मोसंबी, गहू, हरभरा, डाळींब, कापूस, ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाले. जवळा येथील गणेश कृष्णराव मोरे, सुरेखा गणेश मोरे यांची संत्रा बाग नष्ट झाली. या ११०० संत्रा झाडांचे नुकसान होवून तब्बल १३ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. डाळींबाची १०० झाडे वादळात कोलमडली.
सुरेंद्र चौधरी, संतोष चौधरी, राजू चौधरी, गणेश दुर्गे, हरिभाऊ चरेगावकर, किन्ही येथील राजू चव्हाण यांचेही मोठे नुकसान झाले. गुरूदेव विद्यालय जवळा या शाळेच्या चार खोल्यावरील टीनपत्रे उडाली. माधवराव राठोड यांच्या गोठ्याचे टिनपत्रे उडाली. आकाश इंगळे, श्रीराम गायकवाड, भारत पवार, शेख नबी शेख रियाज, अरुण ओंकार, बापू जयस्वाल यांच्या घरावरची टिनपत्रे उडाली. गणेश मोरे यांच्या गोठ्यातील बैलावर जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने बैल जागीच ठार झाला. राजू चव्हाण यांच्या शेतातील २३ एकर फळबाग, एम.टी. जाधव यांची १३ एकर फळबाग, गणेश मोरे यांचे ११ एकर फळबाग नष्ट झाली. या शिवाय गवणा येथील मंजुषा मनोहर जिल्लेवार, सुहास जिल्लेवार यांच्याही फळबागेचे नुकसान झाले.
जवळा परिसरातील ४७० हेक्टर, ब्राह्मणवाडा ४७० हेक्टर, खेड १५८ हेक्टर, उमरी ५० हेक्टर, खंडाळा २१४ हेक्टर, लोणी ७० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने तयार केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arni blared hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.