सैन्य भरतीचे उमेदवार गारठले
By Admin | Updated: January 16, 2017 01:00 IST2017-01-16T01:00:16+5:302017-01-16T01:00:16+5:30
कडाक्याच्या थंडीने संपूर्ण जिल्हा गारठला. पारा ८.४ अंशांपर्यंत खाली आला. याचा फटका सैन्य भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

सैन्य भरतीचे उमेदवार गारठले
कडाक्याची थंडी : दहा जिल्ह्यातील उमेदवारांची यवतमाळकडे धाव
यवतमाळ : कडाक्याच्या थंडीने संपूर्ण जिल्हा गारठला. पारा ८.४ अंशांपर्यंत खाली आला. याचा फटका सैन्य भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे.
विदर्भस्तरीय सैन्य भरती यवतमाळच्या नेहरू स्टेडियमवर सुरू आहे. या ठिकाणी जवळपास ५० हजार विद्यार्थी येत आहेत. प्रत्येक दिवशी एक जिल्हा, याप्रमाणे विदर्भातील १० जिल्ह्यासाठी ही भरती घेतली जात आहे. रोज पाच ते सहा हजार विद्यार्थी या ठिकाणी येत आहे. रात्री दीडपासून भरती प्रक्रियेचे कामकाज सुरू होते. यासाठी विद्यार्थ्यांना रात्री रांगेत उभे राहावे लागते. कागदपत्रांसह विविध चाचण्यांसाठी हा वेळ अपुरा पडतो. उंची, छाती आणि शारीरिक क्षमता तपासणीसाठी चाचणी घेतली जाते.
याच कालावधीत थंडीचा प्रकोप वाढला आहे. स्वेटर घातल्यानंतरही थंडी सहन होत नाही. अशा स्थितीत विविध चाचण्यांसाठी उघड्या अंगाने चाचणी द्यावी लागत आहे. सैन्यात भरती होण्यापूर्वीच निसर्ग प्रकोपाचा त्यांना सामना करावा लागत आहे. भरतीपूर्वीच त्यांची निसर्गाशी गाठ पडत आहे. मात्र यातून त्यांना पुढे लाभच होणार आहे (शहर वार्ताहर)
केळी उत्पादनाला फटका
केळी आणि द्राक्ष बागांसाठी अतिथंडी हानीकारक आहे. यवतमाळ जिल्ह्यात केळीची लागवड झाली आहे. केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीचा फटका बसला आहे. थंडीमुळे फुलझाडांची फुले उगविण्याची क्षमताही घटली आहे. गुलाब, शेवंतीसह, डेलीयाचे फुलही वाढत्या थंडीने कोमेजले आहे.