सेनेचा बंद कडकडीत

By Admin | Updated: June 29, 2016 02:22 IST2016-06-29T02:22:31+5:302016-06-29T02:22:31+5:30

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रीयते विरोधात शिवसेनेने पुकारलेल्या यवतमाळ बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Army cracked off | सेनेचा बंद कडकडीत

सेनेचा बंद कडकडीत

वाढत्या गुन्हेगारीविरोधात मोर्चा : पोलिसांचा मनाई आदेश झुगारला
यवतमाळ : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रीयते विरोधात शिवसेनेने पुकारलेल्या यवतमाळ बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहर कडकडीत बंद होते. पोलिसांनी शिवसैनिकांना मोर्चाची परवानगी नाकारली होती. मात्र हा मनाई आदेश झुगारुन पोलिसांविरोधात घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चेकऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांपुढे पोलीस यंत्रणेच्या निष्क्रीयतेचा पाढाच वाचला.
यवतमाळ शहरात अवैधधंद्याचा सुळसुळाट झाला आहे. सततच्या घरफोड्या, चोऱ्या, खुलेआम सुरू असलेला मटका, जुगार अड्डे, मंगळसूत्र हिसकावणे, खिसे कापणे, पिशव्या पळविणे, गोधनाची कत्तल होत असल्याच्या घटनेविरोधात शहरातील सामान्य जनतेत प्रचंड रोष आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात शिवसेनेने यवतमाळात मंगळवारी बंदची हाक दिली होती. मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी मोर्चा निघणार होता. यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजता शिवसेनच्या जिल्हाध्यक्षाकंडे मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. त्यासोबत कुठलेही निदर्शने न करण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती.
मात्र जनतेचा प्रचंड रोष असल्याने शिवसेने परवानगी झुकारून मोर्चा काढला. यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली.
शिवसेनेच्या बंदला सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला. यामुळे व्यासायिक प्रतिष्ठान आणि पेट्रोलपंप बंद होते. बंदने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांंंडे, गजानन डोमाळे, शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा व्यापारी आघाडी प्रमुख प्रवीण निमोदिया, किशोर इंगळे, सूरज गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख लता चंदेल आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

जिल्हाधिकाऱ्यांपुढे नोंदविली नापसंती
बंदी झुगारून मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षावर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. मोर्चेकऱ्यांनी यवतमाळकरांच्या भावना तीव्र स्वरूपात जिल्हा प्रशासनापुढे मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी अवैधधंद्यांविरोधात पुरावे मागितले. शिवसैनिकांनी बुधवारी हे पुरावे सादर करण्याचे आश्वासन दिले. चोऱ्यांच्या वाढत्या घटनावर तीव्र नापंसती नोंदविली.

शिवसैनिक हा जागरूक असून, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तो सदैव रस्त्यावर उतरतो. त्यासाठी कुणाच्या आदेशाची वाट पाहत नाही. सच्चा शिवसैनिकांनी विविध संघटनांना घेऊन आंदोलन केले. तर मी शिवसैनिक असलो तरी शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. जिल्ह्यात व शहरात होणाऱ्या घटना दुर्दैवी आहेत. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना वारंवार निर्देश दिले आहेत. आता कालबद्ध कार्यक्रम आखून दिला असून, दीड महिन्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसणार आहे. प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेबाबत कुणाचीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.
- संजय राठोड,
पालकमंत्री, यवतमाळ.

Web Title: Army cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.