यवतमाळात पोलीस शिपायावर सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: December 26, 2016 01:47 IST2016-12-26T01:47:24+5:302016-12-26T01:47:24+5:30
स्थानिक बसस्थानक परिसरातील एका भोजनालयासमोर मद्यपान करण्यास मज्जाव केल्याने आरोपीने धारदार गुप्तीने पोलीस शिपायावर हल्ला केला.

यवतमाळात पोलीस शिपायावर सशस्त्र हल्ला
यवतमाळ : स्थानिक बसस्थानक परिसरातील एका भोजनालयासमोर मद्यपान करण्यास मज्जाव केल्याने आरोपीने धारदार गुप्तीने पोलीस शिपायावर हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. पेट्रोलिंगवरील चार्ली पथकातील शिपायांनी आरोपीला अटक करून वडगाव रोड ठाण्यात आणले असता तेथेही आरोपीने तोडफोड केली.
जितू ऊर्फ जितेंद्र चंदूजी खत्री (३०) रा.आमराईपुरा, असे पोलीस शिपायावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मुख्यालयातील शिपाई मोहमद जुनेद मोहमद याकूब व सुधाकर केंद्रे हे शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यांना बसस्थानक परिसरात कुख्यात आरोपी जितू खत्री हा भर रस्त्यात मद्यपान करीत असताना दिसला. त्याला मोहमद जुनेद यांनी हटकले असता, खत्रीने जुनेदवर धारदार गुप्तीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविला असता, पोटात गुप्ती भोसकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या झटापटीत सुधाकर केंद्रे यांनी आरोपीला कसेबसे मागून पकडले. त्यानंतर तत्काळ जितूला वडगाव रोड ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्याने ठाण्यातील खिडकीवर डोक आदळून काचा फोडल्या. टेबल तोडला. एवढेच नव्हे तर त्याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना वाहनाच्या ग्रीलवर डोके आदळले. रुग्णालयातही त्याने तोडफोडीचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार देवीदास ढोले, सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, संतोष केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ल्याचा, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा, आत्महत्या करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय हत्त्यार बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात दहशत असल्याचे सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)