आर्णीची पाणीपुरवठा योजना ४१ कोटींवर
By Admin | Updated: August 18, 2014 23:49 IST2014-08-18T23:49:22+5:302014-08-18T23:49:22+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची

आर्णीची पाणीपुरवठा योजना ४१ कोटींवर
हरीओम बघेल - आर्णी
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची माहिती पत्र परिषदेत देण्यात आली.
आर्णी ही ग्रामपंचायत असताना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आर्णी ग्रामपंचायतला कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना १८ कोटींची मंजूर झाली होती. यानंतर यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होण्यापूर्वीच ग्रामपंचायतचे रुपांतर १६ आॅगस्ट २०११ रोजी नगर परिषदेत झाले. त्यानंतर शासनाने नगर परिषदेसाठी असलेल्या सूजल, निर्मल अभियानांतर्गत आर्णी नगर परिषद पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्ताव मागितला. नगर परिषदेने जीवन प्राधिकरणाकडून सर्वेक्षण, आराखडा व अंदाजपत्रक बनवून त्वरित सादर केले.
यानंतर या योजनेसाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सदर योजना ४१.८१ कोटींची मंजूर झाली. या निधीला तांत्रिक मान्यतासुद्धा मिळाली आहे. २७ किलोमीटर लोखंडी पाईपव्दारा अरूणावती धरणातून आर्णी शहरातील पाण्याच्या टाकीत पाणी आणल्या जाईल. यासाठी जुन्या अस्तित्वात असलेल्या २.७५ व १.५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांसोबतच दोन पाच लाख व साडे चार लाख लिटर क्षमतेच्या टक्यांची निर्मिती करण्यात येईल. शहरांतर्गत ७० किलोमीटर वितरण व्यवस्था राहील. १०० ते २०० मिलीमीटरची पाईप लाईन जाणार आहे. या योजनेसाठी नगर परिषदेने निविदा प्रक्रियेसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या योजनेसंदर्भात कामात अडचणी येणार नाही. व ई-निविदा पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे काम करता येईल. या योजनेसाठी असलेल्या निधीच्या एकूण रकमेच्या ९० टक्के वाटा राज्य शासनाचा असून, १० टक्के रक्कम नगर परिषदेला खर्च करावी लागणार आहे. ही रक्कम नगर परिषद पाणीकर, गृहकर, विकास शुल्क व तेराव्या वित्त आयोग निधीतून भरणार आहेत. या योजनेचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असून, ही योजना सुरू होण्याची १८ महिन्यांचा कालावधी लागेल. योजना पूर्ण झाल्यानंतर १२ महिने ती संबंधित कंत्राटदाराला चालवून दाखवावी लागेल.
या कालावधीत काय अडचणी येतात याचाही विचार होईल. या अडचणी दूर झाल्यानंतर ही योजना नगर परिषदेला हस्तांतरण करून घेऊ यामुळे आर्णीकरांना शुद्ध पाणी मिळू शकेल अशी माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. या योजनेमुळे आर्णी शहराचा शुद्ध पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष आरीज बेग, उपाध्यक्ष निता ठाकरे व पाणीपुरवठा सभापती निता ठाकरे यांची उपस्थिती होती.