वणी तालुक्यातील विद्युत प्रकल्पांबाबत उदासीनता
By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:40:58+5:302014-05-11T00:40:58+5:30
कमी दाबाचा वीज पुरवठा, वीज टंचाईतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी वणी तालुक्यातील रांगणा, भुरकी, वांजरी आणि शिंदोला, अडेगाव पट्ट्यात विद्युत प्रकल्प

वणी तालुक्यातील विद्युत प्रकल्पांबाबत उदासीनता
विलास ताजने - शिंदोला
कमी दाबाचा वीज पुरवठा, वीज टंचाईतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी वणी तालुक्यातील रांगणा, भुरकी, वांजरी आणि शिंदोला, अडेगाव पट्ट्यात विद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु दीर्घ कालावधी लोटूनही विद्युत प्रकल्पाची उभारणी आजपर्यंत झालीच नाही़ वणी तालुका कोळसा खाणींमुळे सर्वत्र परिचित आहे. येथे नव्याने अनेक व्यवसाय सुरू झाले आहे. तालुक्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात दिवसेंदिवस विजेची मागणीही वाढत आहे. वाढती वीज मागणी लक्षात घेता वणी तालुक्यातील वीज टंचाई दूर करण्यासाठी सुमारे १३ ते १४ वर्षांपूर्वी मित्तल उद्योग समूहाने विद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी तालुक्यात सर्वेक्षण केले होते़ सर्व्हेक्षणानंतर भुरकी व रांगणा या परिसरात नवीन विद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी जमीन संपादन प्रक्रियेकरिता शेतकर्यांना नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या़ भुरकी आणि वांचरी परिसरात आवश्यक पाणी, कोळसा व जमीन असल्यामुळे मित्तल उद्योग समूहाने या परिसराची विद्युत प्रकल्प निर्मितीकरिता निवड केली होती. मात्र राज्य महामार्गावरून ‘रोप-वे’ नेण्यास अडचणी आल्यामुळे भुरकी व वांजरी येथील विद्युत प्रकल्प रखडला. भुरकी आणि वांजरी येथील प्रकल्प गोत्यात सापडल्याने मित्तल उद्योग समूहाने शिंदोला, अडेगाव या परिसरात विद्युत प्रकल्प निर्मितीकरिता पाहणी केली़ या परिसरातदेखील कोळसा, पाणी, खासगी व शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सदर भागाची निवड करण्यात आली होती़ परंतु माशी कुठे शिंकली, कोण जाणे, या प्रकल्पाचा अद्याप कुणालाच मागमूसही लागू शकला नाही़