हुंडाविरोधी कायदा ठरतोय कुचकामी
By Admin | Updated: May 25, 2015 02:34 IST2015-05-25T02:34:33+5:302015-05-25T02:34:33+5:30
हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी आजही सर्रास हुंडा घेतला जातो. फरक एवढाच की हा व्यवहार आतबट्ट्याचा असतो.

हुंडाविरोधी कायदा ठरतोय कुचकामी
दिग्रस : हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी आजही सर्रास हुंडा घेतला जातो. फरक एवढाच की हा व्यवहार आतबट्ट्याचा असतो. तर काही ठिकाणी रोख रकमेऐवजी सोने घेण्याचा कल आहे. त्यातच लग्नाच्या मानपानावर मोठा खर्च करण्याची अटही घातली जाते. एकंदरित वधू पित्याकडून दुसऱ्या मार्गाने पैसा उकळण्याचा वरपक्षाचा प्रयत्न असतो. अशा स्थितीत हुंडा विरोधी कायदा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
हुंडा विरोधी कायदा शासनाने केला आहे. मात्र तर कायद्याला न जुमानता वर पक्ष वधूपक्षाकडून वाटेल तेवढा हुंडा मोजून घेतात. मुलगा नोकरीवाला असेल तर त्याचे दरच ठरलेले असतात. काही अपवाद सोडले तर प्रत्येकच लग्नात कमी जास्त प्रमाणात हुंडा घेतला जातो. वाजत गाजत लग्न केले जाते. मुलीचा संसार सुखाचा व्हावा तिला कोणतीही अडचण जाऊ नये, अशी प्रत्येक वधू पित्याची इच्छा असते. याच इच्छेतून तो नकळत हुंडा प्रथेला खतपाणी घालत असतो. दरवर्षी शेकडो लग्न होतात. या लग्नात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. मात्र काही ठिकाणी लग्नाचा बडेजाव केला जातो. मानपानावरून वाद उत्पन्न होतात. अलिकडे तर एसी हॉल आणि वरातीचा खर्च मुलीकडल्यांनी करावा, अशी अटच घातली जाते. तर काही ठिकाणी रोख रक्कम चुपच्याप घेऊन लग्न साध्या पद्धतीने लावले जाते.
शासनाने हुंडा विरोधी समाज प्रबोधनासाठी विविध उपाय केले आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे हुंडा प्रथेला विरोध केला जातो. (प्रतिनिधी)