नेरमधील १४२ सार्वजनिक नळ वसुलीसाठी ऐन उन्हाळ्यात बंद
By Admin | Updated: May 9, 2014 01:20 IST2014-05-09T01:20:18+5:302014-05-09T01:20:18+5:30
नगरपरिषदेच्या हद्दीतील १४२ सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हे कनेक्शन बंद केल्याने नगरपरिषदेमध्ये पाणी पेटले आहे.

नेरमधील १४२ सार्वजनिक नळ वसुलीसाठी ऐन उन्हाळ्यात बंद
नेर : नगरपरिषदेच्या हद्दीतील १४२ सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हे कनेक्शन बंद केल्याने नगरपरिषदेमध्ये पाणी पेटले आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी मात्र हा शासनाचा आदेश असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याची माहिती दिली.
नेर-नबाबपूर नगरपरिषदेमध्ये शासनाच्या सुजल निर्माण अभियान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेमध्ये नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक नळ थांबे बंद करण्यात येईल, असे नगरपरिषदेने राज्य शासनासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनस्तरावरील सभेमध्ये ऊहापोह करण्यात आला. नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक नळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी १४२ सार्वजनिक नळ १ मार्च २0१४ पासून बंद करण्यात आले. याची माहिती रिक्षावरून जनतेला देण्यात आल्याचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सांगितले.
ज्या ठिकाणावरील सार्वजनिक नळ काढले तेथील जनतेला सवलतीच्या दरात ४00 नळकनेक्शन देण्यात आले. त्यामुळे नगरपरिषदेच्या वार्षिक उत्पन्नात चार लाख रुपये वाढ झाली व मालमत्ता कराची ही वसुली झाल्याचे सांगण्यात येते. या मोहिमेंतर्गत १0 अवैध नळ जोडणी करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपरिषदेने शहराला स्टॅन्डपोस्ट मुक्त केले आहे. मात्र नगरपरिषदेला हे शहानपण उन्हाळ्याच्या तोंडावरच का सुचले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला सवलतीत नळयोजना देवून १४२ सार्वजनिक नळ नगरपरिषदेला बंद करता आले असते. मात्र या बाबी नगरपरिषदेने विचारात घेतल्या नाही व नळ बंद करून वसुलीचा सपाटा सुरूकेला आहे. यामुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या प्रश्नावरून सध्या नेर नगरपरिषदेचे राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या नगरसेविका प्रतिभा बगमारे यांनी ही नगरपरिषदेची मनमानी असल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. एकीकडे नळकनेक्शन बंद करणे व दुसरीकडे वसुलीचा सपाटा लावणे यामुळे नगरपरिषदेपुढे विचित्र पेच निर्माण झाला असून त्यांना विरोधक व जनतेच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)