अण्णासाहेबांचे कार्य प्रेरणादायी

By Admin | Updated: February 6, 2016 02:31 IST2016-02-06T02:31:06+5:302016-02-06T02:31:06+5:30

अत्यंत सामान्य परिस्थितीतून अण्णासाहेब खडसे यांनी मागासर्गीयांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. हजारो विद्यार्थ्यांचे जीवन त्यांनी घडविले. त्

Annasaheb's work inspirational | अण्णासाहेबांचे कार्य प्रेरणादायी

अण्णासाहेबांचे कार्य प्रेरणादायी

विजय दर्डा : अण्णासाहेब खडसेंच्या पुतळ्याचे अनावरण
यवतमाळ : अत्यंत सामान्य परिस्थितीतून अण्णासाहेब खडसे यांनी मागासर्गीयांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. हजारो विद्यार्थ्यांचे जीवन त्यांनी घडविले. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
येथील लोकहित शैक्षणिक संकुल परिसरात लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार दौलतराव उपाख्य अण्णासाहेब खडसे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक होते. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार कीर्ती गांधी, विजय पाटील चोंढीकर, विजय खडसे, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, संस्थेचे सचिव जयानंद खडसे, अध्यक्ष महेश खडसे उपस्थित होते.
खासदार विजय दर्डा यांनी नाईक-दर्डा-खडसे परिवाराचे ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांनी अण्णासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचा आज दिसणारा वटवृक्ष सहजासहजी झाला नाही. त्यासाठी अण्णासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. (नगर प्रतिनिधी)

अण्णासाहेब खडसे यांच्या पुतळ्याचे अनावरण
यवतमाळ : येथील लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार दौलतराव उपाख्य अण्णासाहेब खडसे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
या प्रसंगी विजय दर्डा म्हणाले, अण्णासाहेबांनी सामान्यांना शैक्षणिक दालन खुले करून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी भीक मागितली. एक धोतर आणि सदऱ्यात दिवस काढले, अशा या व्यक्तीमत्वाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे उपस्थित असल्याचे सांगितले. जग निर्माण करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण हेच जग बदलू शकते. सध्या देश वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. परंतु सामान्य माणूस महत्वाचा आहे. मंदिर बांधण्यापेक्षा शिक्षणाचे काम मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
या ठिकाणी एक हजार मुली शिकत आहे. हे कार्य महान आहे. सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांनीही ‘लेक वाचवा’ ‘लेक शिकवा’ चा नारा दिला होता. मुलींच्या शिक्षणासाठी लोकहित संस्था करीत असलेले कार्य महान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना जिद्द सोडू नका, स्वप्न मोठे बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला दिला.
अण्णासाहेबांमुळेच घडलो - शिवाजीराव मोघे
यावेळी स्वागताध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी आपण अण्णासाहेबांमुळेच कसे घडलो हे सांगत आपण त्यांच्या वसतिगृहाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. अण्णासाहेबांच्या अनेक आठवणींना मोघे यांनी उजाळा दिला. माजी आमदार विजय खडसे यांनीही अण्णासाहेबांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. संस्थेचे सचिव जयानंद
खडसे यांनी प्रास्ताविकातून अण्णासाहेबांचा जीवनपट उलगडत पुतळा उभारण्यामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी अण्णासाहेबांच्या जीवनावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रा. सत्यवान देठे यांनी केले. आभार डॉ. वीरेंद्र खडसे यांनी मानले.
कार्यक्रमाला लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, चंदन तेलंग, प्राचार्य शंकरराव सांगळे, नरेंद्र कवडे, अ‍ॅड. नवीन खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र हेंडवे यांच्यासह लोकहीत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. (नगर प्रतिनिधी)
तीन पिढ्यांचे संबंध - मनोहरराव नाईक
यावेळी आमदार मनोहरराव नाईक यांनी खडसे आणि नाईक परिवाराचे तीन पिढ्यांचे संबंध आहे. आजही हे संबंध कायम आहे. अण्णासाहेबांनी अनेक संकटांंना पार करीत मागासवर्गीयांना शिक्षणाचे दालन उघडे केले. शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. या शैक्षणिक कार्यात खडसे परिवाराच्या पाठीशी आपण कायम उभे राहणार असल्याचे सांगितले.

Web Title: Annasaheb's work inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.