अनिताताई नाईक यांचे राष्ट्रवादीतर्फे नामांकन
By Admin | Updated: October 28, 2016 02:04 IST2016-10-28T02:04:58+5:302016-10-28T02:04:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुसद नगराध्यक्ष पदासाठी अनिताताई मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले.

अनिताताई नाईक यांचे राष्ट्रवादीतर्फे नामांकन
नगराध्यक्ष निवडणूक : नगरसेवकांसाठी पाच जणांचे अर्ज
पुसद : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुसद नगराध्यक्ष पदासाठी अनिताताई मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी नामांकन दाखल केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच नगरसेवकांसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले आहे. भाजपा आणि शिवसेनेचा अद्याप उमेदवार निश्चित नसून काँग्रेसने उमेदवार घोषित केला असला तरी नामांकन मात्र दाखल करण्यात आले नाही.
पुसद नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ता आहे. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जात असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या पत्नी अनिताताई नाईक यांनी नामांकन दाखल केले. अनितातार्इंनी नामांकन दाखल केल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसरीकडे काँग्रेसने दोन दिवसापूर्वी मुंबईत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शुभांगी पानपट्टे यांच्या नावाची घोषणा केली होती. परंतु त्यांनी अद्यापही नामांकन दाखल केले नाही. शिवसेना व भाजपा पक्षाने अद्यापपर्यंत आपले उमेदवारच निश्चित केले नाही. नामांकन दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असून आॅनलाईन प्रक्रियेत वेबसाईडची गतीही संथ आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी धांदल उडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे नगरसेवक पदासाठी गुरुवारी भाजपाच्या एका उमेदवारासह इतर चार जणांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात भाजपाच्या ज्योती संतोष मुकेश, अपक्ष उमेदवार अहेमद अशपाक, जुबेर अगवान, शेख आसीफफनबी आणि कुंदा राजेश चिद्दरवार यांचा समावेश आहे. तर शंकर बोधणे यांनी बुधवारी नामांकन दाखल केले होते. २४ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र पहिले दोन दिवस उमेदवारांनी नामांकनच दाखल केले नाही. तिसऱ्या दिवशी एका उमेदवाराने नामांकन दाखल केले. गुरुवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २९ आॅक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असून येत्या दोन दिवसात नामांकनाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले आणि सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी अजय कुरवाडे काम पाहत आहे. (प्रतिनिधी)