देवसरीच्या विद्यासाठी शासकीय डॉक्टर झाले देवदूत
By Admin | Updated: April 18, 2017 00:11 IST2017-04-18T00:11:23+5:302017-04-18T00:11:23+5:30
शासकीय रुग्णालयांबाबत जनसामान्यात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असताना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर मात्र सर्पदंश झालेल्या एका महिलेसाठी देवदूत ठरले आहे.

देवसरीच्या विद्यासाठी शासकीय डॉक्टर झाले देवदूत
विषारी सापाचा दंश : उमरखेडच्या रूग्णालयात १२ तास उपचारानंतर जीवदान
उमरखेड : शासकीय रुग्णालयांबाबत जनसामान्यात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असताना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर मात्र सर्पदंश झालेल्या एका महिलेसाठी देवदूत ठरले आहे. देवसरीच्या विद्या देवसरकर या महिलेवर तब्बल बारा तास उपचार करून या डॉक्टरांनी तिला जीवदान दिले.
उमरखेड तालुक्यातील देवसरी येथील विद्याताई साहेबराव देवसरकर यांना शनिवारी रात्री ८.३० वाजता विषारी सापाने दंश केला. तिच्या ओरड्याने घरातील मंडळी धावून आली. तोपर्यंत तिच्या तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडली. गावातील सचिन देवसरकर, गजेंद्र देवसरकर, शेषराव देवसरकर यांनी तिला उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्या प्रकृती धोक्यात होती. या ठिकाणी उपस्थित डॉ.श्रीकांत जयस्वाल यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. त्यांच्या मदतीला डॉ. मोहंमद गौस, डॉ. उमेश मांडन, डॉ. हनुमंत धर्मकारे, डॉ. विवेकानंद मोरेश्वर, राहुल मोहिते, ताई नांदेडकर धावून आले. विद्याताईची मृत्यूशी झुंज सुरू होती. शनिवारी रात्री उपचार सुरू झाला. तो रविवारी सकाळी १० वाजता ती शुद्धीवर आली. तब्बल बारा तासानंतर तिने डोळे उघडले. त्यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला. विद्याताईला शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. येथील शासकीय रुग्णालयात गत काही दिवसांपासून सर्पदंशाच्या रुग्णावर हमखास उपचार केले जात असल्याने असे रुग्ण मोठ्या आशेने येथे येतात. (शहर प्रतिनिधी)
जातीपातीच्या भिंती बाजूला सारुन प्रार्थना
विद्या देवसरकर रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी विद्याताईसाठी प्रार्थना केली. मुस्लीम महिलांनीही करुणा भाकली. उमरखेड रुग्णालयात जातीपातीच्या भिंती बाजूला सारुन विद्यासाठी सर्वजण प्रार्थना करीत होते. या घटनेतून माणुकीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय आला.