महागावात आंध्रातील सागवान तस्कर
By Admin | Updated: July 31, 2014 00:16 IST2014-07-31T00:16:19+5:302014-07-31T00:16:19+5:30
निसर्ग संपन्न महागाव तालुक्यातील बहुमूल्य सागवान वृक्षावर आंध्रप्रदेशातील तस्कारांची नजर गेली आहे. स्थानिकांच्या सहकार्याने कत्तल करून हैद्राबादपर्यंत सागवान लंपास होत आहे.

महागावात आंध्रातील सागवान तस्कर
रितेश पुरोहित - महागाव
निसर्ग संपन्न महागाव तालुक्यातील बहुमूल्य सागवान वृक्षावर आंध्रप्रदेशातील तस्कारांची नजर गेली आहे. स्थानिकांच्या सहकार्याने कत्तल करून हैद्राबादपर्यंत सागवान लंपास होत आहे. जंगलात ठिकठिकाणी सागवानाची थुटे कत्तलीची साक्ष देत आहे. मात्र वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
महागाव तालुक्यात १० हजार हेक्टरवर जंगल आहे. या जंगलात बहुमूल्य सागवानासह विविध जातीचे वृक्ष आहे. गेल्या काही वर्षात सागवान तस्करांचा डोळा या जंगलावर आहे. दिवसाठवळ््या जंगलात शिरून तोड केली जात आहे. गेल्या आठवड्यात अमडापूर बिटमध्ये सागवान तस्करांची टोळी पकडण्यात आली, त्यावरून या जंगलात तस्कर सक्रीय असल्याचे सिद्ध झाले.
आंध्रप्रदेश आणि मराठवाड्याची सीमा महागाव तालुक्याला लागून आहे. आंध्रप्रदेशातील तस्कर स्थानिक चोरट्यांच्या मदतीने सागवानाची तोड करतात.
सागवान तस्करीमध्ये आंध्रप्रदेशातील दोन ते तीन टोळ््या कार्यरत आहेत. स्थानिक टोळ््या केवळ सागवान तोडीचे काम करते तर आंध्रप्रदेशातील तस्कर रात्री वाहनांमधून सागवानाची तस्करी करते. महागाव जंगलातील सागवान मराठवाड्यासह आंध्रप्रदेशातील हैद्राबादपर्यंत जात असल्याची माहिती आहे. फुलसावंगी, अमडापूर यासह इतर जंगलात फेरफटका मारला तरी तोडलेल्या सागवानाची थुटे सर्वत्र दिसून येतात. सर्वसामान्यांना दिसणारा हा प्रकार वन कर्मचारी व अधिकाऱ्यांना मात्र दिसत नाही. यामागचे कारण ही तसेच आहे. सागवान तस्कर आणि काही वन कर्मचाऱ्यांचे हित संबंध गुुंतले आहे. त्यामुळे केवळ कारवाईचा देखावा केला जातो. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास जंगलातून सागवान नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.