अन् त्याने आणले चालकाचे फिटनेस

By Admin | Updated: November 14, 2016 01:14 IST2016-11-14T01:14:51+5:302016-11-14T01:14:51+5:30

निवडणूक प्रचारातील वाहनांसाठी परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यासाठी परिवहन विभागाकडून फिटनेस

And he brought the driver's fitness | अन् त्याने आणले चालकाचे फिटनेस

अन् त्याने आणले चालकाचे फिटनेस

नगरपरिषद निवडणूक : सुशिक्षित उमेदवाराने मारला डोक्यावर हात
यवतमाळ : निवडणूक प्रचारातील वाहनांसाठी परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यासाठी परिवहन विभागाकडून फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता असते. मात्र एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने वाहनाच्या फिटनेस ऐवजी चक्क चालकाचेच फिटनेस काढून आणले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा सुशिक्षित उमेदवार चांगलाच खजील झाला.
यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून प्रचार केला जात आहे. मात्र अशा वाहनाची परवानगी तहसील कार्यालयातून घ्यावी लागते. एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार वाहनाच्या परवानगीसाठी तहसील कार्यालयात गेला. त्यावेळी त्याला फिटनेस सर्टिफिकेट आणण्याचे संबंधिताने सांगितले. त्यानंतर हा उमेदवार थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या चालकाला घेऊन पोहोचला. त्या ठिकाणी त्याची तपासणी केली. प्रमाणपत्र घेतले आणि सदर प्रमाणपत्र निवडणूक विभागाच्या हवाली केले.
सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरही आपल्या वाहनाला परवानगी का मिळत नाही असा प्रश्न त्याला पडला. चौकशीसाठी तो पुन्हा तहसील कार्यालयात गेला. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून हा सुशिक्षित उमेदवाराने डोक्यावर हात मारुन घेतला. त्याचे झाले असे की, संबंधिताने त्यांना वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओ कार्यालयातून काढून आणायला सांगितले होते. परंतु या उमेदवाराने अतिउत्साहात आपल्या वाहनाच्या चालकाचीच वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र सादर केले. निवडणुकीच्या धावपळीत महत्वाचा दिवसही गमावला आणि फजिती झाली ती वेगळीच. आपल्याकडून अशी चूक झालीच कशी असा प्रश्न करीत तो आता डोक्यावर हात मारुन घेत आहे. निवडणूक काळात येथील तहसील परिसरात अशा अनेक गमतीजमती पहावयास मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: And he brought the driver's fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.