अमेरिकेच्या विद्यार्थ्यांचे उमरखेडमध्ये शैक्षणिक धडे

By Admin | Updated: July 8, 2015 00:10 IST2015-07-08T00:10:51+5:302015-07-08T00:10:51+5:30

भारतातून परदेशात त्यातही अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रगत असलेल्या अमेरिकेच्या एका विद्यापीठातील चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी ...

American students learn educational lessons in Umarkhed | अमेरिकेच्या विद्यार्थ्यांचे उमरखेडमध्ये शैक्षणिक धडे

अमेरिकेच्या विद्यार्थ्यांचे उमरखेडमध्ये शैक्षणिक धडे

स्टडी अ‍ॅब्रॉड प्रोग्राम : ओहियो विद्यापीठाचे चार प्राध्यापक, सात विद्यार्थी दाखल
उमरखेड : भारतातून परदेशात त्यातही अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रगत असलेल्या अमेरिकेच्या एका विद्यापीठातील चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी उमरखेड सारख्या मागास तालुक्यात येऊन शैक्षणिक धडे घेत आहे. अमेरिकेच्या ओहियो विद्यापीठाच्या स्टडी अ‍ॅब्रॉड उपक्रमांतर्गत ही मंडळी सध्या उमरखेडमध्ये दाखल झाली आहे.
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात हे परदेशी पाहुणे आता धडे गिरवत आहे. या महाविद्यालयाचे संजीवक दिवंगत डॉ. आत्माराम गावंडे महाविद्यालयाला तिसरे अपत्य मानत होते. महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. भारतातील चांगले ते अमेरिकेत गेले पाहिजे, अमेरिकेतील चांगले भारतात आले पाहिजे, असे ते सांगत होते. यासाठीच त्यांनी अमेरिकेतील अथेन्स येथील ओहियो विद्यापीठाला मोठी देणगी दिली. या विद्यापीठात डॉ. आत्माराम व डॉ. सुशीला गावंडे अध्यासन निर्माण झाले आहे. यातूनच गो.सी. गावंडे महाविद्यालय आणि ओहीओ विद्यापीठात सामंजस्य करार झाला. त्याचाच एक भाग म्हणून ओहियो विद्यापीठाने आपले चार प्राध्यापक आणि सात विद्यार्थी भारतात खास करून उमरखेडमध्ये पाठविले.
ही मंडळी महिनाभर राहून धार्मिक, सामाजिक तळाला भेटी देणार आहे. शिक्षण, समाज, संस्कृती, धर्म, स्त्री जीवन, राजकीय व सामाजिक जीवन जवळून अभ्यासणार आहे. उमरखेडमध्ये दाखल झालेल्यांमध्ये प्रा.जुली अ‍ॅने, प्रा. ब्रायन हेगण, प्रा.हॅडी फॅथरीन, प्रा. अ‍ॅरॉन ग्लेन यांच्यासोबत विद्यार्थी एलिसा मायकेल, एन्समीगर, टेलर एलिसा, सॅन्ससमॅन, कोरटीनी लेन क्रिस्टैनी, आॅलीव्हिया अरलीन गिल्टनर, मार्ग्यालिट लीना ब्रुच, सीमा लॅन पीपीन्स आणि इबेरली ग्रेस सी यांचा समावेश आहे. हा उपक्रम पुढे अनेक वर्ष चालू राहणार आहे. काही वर्षानंतर उमरखेडचे विद्यार्थी अमेरिकेतील ओहीयो विद्यापीठात जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, सचिव डॉ. या.मा. राऊत, नियामक मंडळाचे अध्यक्ष राम देवसरकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि.ना. कदम, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यात सहभागी झाले आहे. अमेरिकेतून आलेले हे विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणाचे धडे घेत असल्याने प्रत्येक जण उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत असतात. (शहर प्रतिनिधी)

Web Title: American students learn educational lessons in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.