रुग्णवाहिकेची ‘दुकानदारी’
By Admin | Updated: October 12, 2015 02:31 IST2015-10-12T02:31:16+5:302015-10-12T02:31:16+5:30
रुग्णवाहिकेद्वारे समाजसेवा सुरू असल्याचे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना दाखवित असले तरी प्रत्यक्षात या रुग्णसेवेआड चक्क खुलेआम ‘दुकानदारी’ सुरू आहे.

रुग्णवाहिकेची ‘दुकानदारी’
रुग्णांची लूट : राजकीय पुढारी-संस्थांकडून समाजसेवेचा केवळ देखावा
सुरेंद्र राऊत यवतमाळ
रुग्णवाहिकेद्वारे समाजसेवा सुरू असल्याचे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना दाखवित असले तरी प्रत्यक्षात या रुग्णसेवेआड चक्क खुलेआम ‘दुकानदारी’ सुरू आहे. समाजसेवेचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. रुग्णाचा नाईलाज हीच संधी समजून त्यांच्या नातेवाईकाची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. नागपुरातील एका हॉस्पिटलद्वारे ढाब्यावर देण्यात आलेल्या ‘शाही पार्टी’ने या दुकानदारीचे यवतमाळ ते नागपूर कनेक्शन उघड झाले आहे.
यवतमाळातून दरदिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण घेऊन अॅम्बुलन्स नागपुरात जातात. हे रुग्ण अधिकाधिक आपल्याकडे यावे म्हणून नागपूरच्या एका हॉस्पिटल व्यवस्थापनाने यवतमाळातील रुग्णवाहिकांच्या चालकांसाठी येथे ‘खास पार्टी’ आयोजित केली होती. या पार्टीत ‘पॅकेज’ही निश्चित झाले. या पार्टीत सहभागी काहींशी खासगीत चर्चा केली असता रुग्णसेवेतील ‘दुकानदारी’चे धक्कादायक वास्तव पुढे आले. त्यानुसार, यवतमाळ शहर व जिल्ह्यात राजकीय पक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्या नावाने अनेक रुग्णवाहिका आहेत. काहींनी आपला राजकीय दबाव वापरून बड्या उद्योगपतींकडून या रुग्णवाहिका आणल्या आहेत. रुग्णवाहिकेवरील ‘स्मृतिप्रीत्यर्थ’ अथवा नेत्यांच्या नावाने ही रुग्णवाहिका नेमकी कुणाची हे सहज ओळखता येते. मात्र यातील बहुतांश रुग्णवाहिकांची ‘दुकानदारी’ आहे. काहींनी तर या रुग्णवाहिका दरमहा सात ते दहा हजार रुपये भाड्याने दिल्या आहेत. त्या चालकाला वाहनाचे मेंटेनन्स, स्वत:चा पगार व नफा काढून हे भाडे द्यावे लागते. एकदा अॅम्बुलन्सचे लोकार्पण झाले की ती संबंधित संस्था-राजकीय नेत्याच्या मर्जीतील एखाद्या चालकाकडे सोपविली जाते. त्यानेच रुग्ण शोधावे, त्यातून आपले वेतन काढावे, गाडीचे मेंटेनन्स ठेवावे आणि दरमहा भाडेही द्यावे, असा हिशेब असतो. व्हॅन असेल तर दरमहा चार हजार रुपये मेंटेनन्ससाठी लागतात. त्याला प्रत्येक सहा महिन्यांनी १२ हजार रुपयांचे टायर लावावे लागतात. रुग्णवाहिकेवरील बहुतांश चालकांना संबंधितांकडून दरमहा वेतन दिले जात नाही. तो स्वत:च रुग्ण शोधून आपला खर्च भागवितो.
एकीकडे रुग्ण गंभीर अवस्थेत प्रत्येक सेकंदाला अखेरचा श्वास मोजत असतो. मात्र या ‘गोल्डन अवर’चा कोणताही विचार न करता चालक रुग्णासह अॅम्बुलन्स पेट्रोलपंपावर लावतो. तेथे रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन पेट्रोल भरले जाते. त्यात किमान १० ते १५ मिनिटे सहज जातात. अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास १० ते १५ मिनिटे विलंब झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांवरून चालक त्यांच्या आर्थिक स्थिती व पाठबळाचा सहज अंदाज बांधतात. त्यावरून रुग्णाला कोणत्या खासगी हॉस्पिटलमध्ये न्यायचे हे तेच ठरवितात. यवतमाळवरून नागपूर गाठेपर्यंत चालक रुग्णाच्या नातेवाईकाचे ‘समूपदेशन’ करतो आणि त्याला अधिकाधिक व तत्काळ रोखीने कमिशन मिळणाऱ्या हॉस्पिटलमध्येच रुग्ण पोहोचवितो. गरीब रुग्णांच्या नातेवाईकाचा नागपुरातील शासकीय रुग्णालयात नेण्याचा आग्रह असतो मात्र तेथेही दारावरच दलाल तयार असतात. ते शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणे बंद असल्याचे, आॅपरेटर नसल्याचे सांगून या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्यासाठी ‘प्रवृत्त’ करतात.
नागपुरातील काही रुग्णालयांनी नेमलेल्या दलालांच्या मारहाणीचा सामना करावा लागला. तेव्हापासून नाईलाजाने का होईना या चालकांनीही ‘दुकानदारी’च्या प्रवाहात सहभाग घेतला. नागपुरातून येताना या रुग्णवाहिका यवतमाळात परत येणारा कुणी पेशंट आहे का, याचा दलालांमार्फत शोध घेतात. पेशंट न मिळाल्यास त्यात प्रवासी भरून आणले जातात. व्हॅनचे नागपुरातील भाडे २५०० ते २७०० रुपये, त्यापेक्षा मोठ्या रुग्णवाहिकेचे चार हजार रुपये, तर वातानुकुलीत वाहन असेल तर पाच हजार रुपये भाडे आकारले जाते. रुग्णवाहिकेचे लोकार्पण होताना नागरिकांना हे वाहन आपल्यासाठी मोफत आहे, असेच वाटते. मात्र प्रत्यक्षात त्याचे भाडे आकारले जाते. त्याशिवाय सेवेच्या नावाखाली रुग्णालयांच्या संगनमताने चालकांकडून रुग्णाच्या नातेवाईकांच्या होणाऱ्या लूटीचा हिशेबच नाही.
येथील एका पदाधिकाऱ्याकडे पाच ते सात रुग्णवाहिका असून त्यापोटी त्याला दरमहा ३० ते ४० हजार रुपये केवळ भाडे मिळत असल्याची बाब या पार्टीतूनच पुढे आली. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या रुग्णवाहिका तर चक्क वर्धा व चंद्रपुरात दारूसाठी वापरल्या जात असल्याचीही चर्चा पुढे आली आहे. येथील शासकीय रुग्णालयांमध्ये विशिष्ट नेत्यांच्याच अॅम्बुलन्सला रुग्ण मिळावे म्हणून तेथील प्रशासनाची मदत घेतली जात आहे.
चालक-मालक एकच असलेल्या अॅम्बुलन्सला रुग्णालयात एन्ट्री नाकारण्यात आली आहे. अशी एखादी रुग्णवाहिका आत शिरलीच तर तिला बाहेर काढण्यासाठी त्या प्रशासनाकडून वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याची ओरड आहे. रुग्णालयाचे हे प्रशासन राजकीय पुढाऱ्याच्या इशाऱ्यावर वागत असल्याने रोष आहे. रुग्णसेवेच्या या ‘दुकानदारी’त काही रुग्णवाहिका अपवाद असल्या तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.
रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या काही प्रामाणिक लोकांनी आपला नाईलाजही कथन केला. जनतेने पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता हे सर्व काही मोठ्या विश्वासाने राजकीय पुढाऱ्यांना दिले आहे. मात्र त्यानंतरही ही मंडळी समाजसेवेचा आव आणून जनतेची लूट करीत आहेत. त्यांनी आम्हाला पगार दिला तर ही लूट सहज थांबू शकते. कारण आमच्यातही माणुसकी शिल्लक आहे. मात्र पोटासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी नाईलाजाने व मन मारून ही माणुसकी गुंडाळून ठेवावी लागत असल्याची खंतही या चालकांनी व्यक्त केली. रुग्णांची आर्थिक अडचण ओळखून अनेकदा आम्ही आमच्या कमाईवर पाणी सोडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयात रुग्णाला अॅडमिट करण्यापूर्वी काऊंटरवर रोख रक्कम जमा करावी लागते. त्या रकमेतूनच काही वाटा चालकाला लगेच दिला जातो. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराला काही प्रामाणिक व जागरूक चालकांनी आपला विरोधही दर्शविला होता.