बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST2021-09-27T04:46:11+5:302021-09-27T04:46:11+5:30
दारव्हा : गाय, बैल संगोपनाची प्रेरणा देणारी, शेतकऱ्यांचा आवडता छंद असलेली बैलगाडा शर्यत सुरू करावी, अशी मागणी शंकरपट प्रेमींच्या ...

बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या
दारव्हा : गाय, बैल संगोपनाची प्रेरणा देणारी, शेतकऱ्यांचा आवडता छंद असलेली बैलगाडा शर्यत सुरू करावी, अशी मागणी शंकरपट प्रेमींच्या वतीने तहसीलदार, ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. यानिमित्ताने देशी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. परंतु शर्यतबंदीमुळे बैलाची उपयुक्तता मूल्य धोक्यात आले आहे. त्यांच्या जतन व संवर्धनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संगोपनाची प्रेरणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
ग्रामीण भागात यात्रांमध्ये बैलाचे प्रदर्शन, शर्यती आयोजित केल्या जातात. यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. मोठी आर्थिक उलाढाल होते. आदी बाबींचा विचार करता बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर किशोर गावंडे, नरेश जाधव, भाऊराव जाधव, भोलेश्वर पवार, नगमा शेख आदींसह शंकरपट प्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.