आयुर्वेद दुकानात अॅलोपॅथी औषधी
By Admin | Updated: September 28, 2015 02:44 IST2015-09-28T02:44:33+5:302015-09-28T02:44:33+5:30
आयुर्वेदिक औषधी विक्रीच्या परवान्यावर अॅलोपॅथीची औषधी विक्री करणाऱ्या येथील गेडामनगर परिसरातील तुळजाई मेडिकल स्टोअर्सवर औषधी प्रशासन विभागाने धाड ...

आयुर्वेद दुकानात अॅलोपॅथी औषधी
साठा जप्त : गेडामनगर परिसरात कारवाई
यवतमाळ : आयुर्वेदिक औषधी विक्रीच्या परवान्यावर अॅलोपॅथीची औषधी विक्री करणाऱ्या येथील गेडामनगर परिसरातील तुळजाई मेडिकल स्टोअर्सवर औषधी प्रशासन विभागाने धाड टाकून कारवाई केली. वर्षभरापूर्वी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतरही येथून अॅलोपॅथीची औषधी विकली जात होती.
तुळजाई मेडिकल स्टोअर्सचे संचालक बाबुराव गोविंदराव कदम आणि केशव शिवानंद जायभाये यांनी भागिदारीत दुकान सुरू केले. मात्र त्याच्या या दुकानावर १ जून २०१४ मध्ये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे नियमित फार्मासिस्ट उपस्थित नव्हता, विनाबिलाने औषधी विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन यवतमाळाचे सहाय्यक आयुक्त अमृत निखाडे यांनी सदर दुकानाचा औषध विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता. मात्र त्यानंतर येथे तुळजाई आयुर्वेदिक पतंजली औषधी दुकान सुरू करण्यात आले. आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली या दुकानातून सर्रास अॅलोपॅथीची औषधी विक्री केली जात होती. यावर पाळत ठेवून औषधी निरीक्षक प्रवीण राऊत आणि अजय माहुले यांनी शुक्रवारी रात्री या दुकानात धाड घातली. तेव्हा येथे प्लास्टिक पिशवीमध्ये लपवून ठेवलेले अॅलोपॅथीचे औषधी आढळली.
तब्बल २७ हजारांचा मुद्देमाल या दुकानातून जप्त करण्यात आला. कोणताही परवाना नसताना औषधांची विक्री केल्याबद्दल या दुकान मालकाविरोधात अन्न व औषधी कायदानुसार न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. शिवाय या दुकानदाराला अॅलोपॅथी औषधी पुरविणाऱ्याचाही शोध औषध निरीक्षक घेत आहेत, अशा प्रकाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील दोषींविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त अमृत निखाडे यांनी दिली.
(कार्यालय प्रतिनिधी)