पाच नगरपंचायतींवर युतीचा झेंडा

By Admin | Updated: November 28, 2015 03:17 IST2015-11-28T03:17:51+5:302015-11-28T03:17:51+5:30

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली.

Alliance of five municipalities | पाच नगरपंचायतींवर युतीचा झेंडा

पाच नगरपंचायतींवर युतीचा झेंडा

महागावात परिवर्तन : काँग्रेस-राष्ट्रवादीचे समीकरण जुळलेच नाही, बाभूळगावात सात जागा असूनही अपयश
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर आलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीला येथेही सत्तेचे समीकरण जुळविताच आले नाही.
नगरपंचायत निवडणूकीत आजी - आमदारांनी प्रचाराचा धुराळा उडवून चूरस निर्माण केली होती. वचपा काढण्याची मनिषा घेऊन काँग्रेस - राष्ट्रवादीच्या दिग्गाजांनी सुध्दा गल्लीबोळीत दौरे करण्यास सुरूवात केली. याचा फायदाही झाला. काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीकडे अधिक संख्याबळ आले. मात्र सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर त्यांच्याकडे नव्हती. बाभुळगाव मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सात नगरसेवक, राष्ट्रवादीचे एक सदस्य आणि अपक्षाची मदत घेऊनही बहुमत गाठता आले नाही. भाजप- सेना युतीने अपक्ष कोमल अंकीत खंते यांना पाठिंबा देत अध्यक्षपदी विराजमान केले. तर शिवसेनेच्या रवींद्र रामचंद्र काळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या सोनाली तातेड आणि चंद्रशेखर सूर्यभान परचाके यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. सात सदस्यांचे संख्याबळ असूनही काँग्रेस नेत्यांना बाभुळगावात सत्तास्थापनेसाठी दोन सदस्यांचे समर्थन मिळविता आले नाही.
कळंब नगरपंचायतीवर शिवसेना पाच, भाजप चार, राष्ट्रवादी तीन, अपक्ष एक यांनी मिळून नगराध्यक्ष म्हणून शिवसेनचे दिगांबर मस्के, उपाध्यक्षपदी भाजपचे मनोज काळे यांनी निवड केली. काँग्रेसचे फारूक सिद्दीकी आणि राजू पड्डा यांना प्रत्येकी चार मते मिळाली. राळेगाव नगरपंचायतीत भाजपकाडे स्पष्ट बहुमत असल्याने घोषणेची औपचारिकताच करण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून बबन रामभाऊ भोंगारे यांनी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे अ‍ॅड़ प्रफुल चव्हाण ११ मतांनी विजयी झाले तर काँग्रेस समर्थीत अपक्ष सदस्य शशिकांत धुमाळ यांना पाच मते मिळाली.
महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीकडेच बहुमत असल्याने सुनील नारायण नरवाडे यांची अध्यक्ष म्हणून तर उदय नरवाडे यांनी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मारेगाव मध्ये शिवसेना - भाजप युतीने विरोधकांचे मनसुबे उधळत आपले संख्याबळ कायम ठेवल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्ष इंदू दिनेश किन्हेकार आणि उपाध्यक्ष प्रशांत नांदे यांनी प्रत्येकी नऊ मते घेऊन विजय प्राप्त केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या जीजाबाई वरारकर आणि अपक्ष खालीद पटेल यांनी प्रत्येकी आठ मते घेतली. झरी येथे भाजपच्या मंदा कवडू सिडाम यांनी नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. शिवसेनेच्या ज्योती संजय विजगुनवार उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी समर्थीत निर्मला कोडापे आणि नंदकिशोर किनाके यांना प्रत्येकी सात मते मिळाली. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस समर्थीत उमेदवाराला संख्याबळ जुळविताच आले नाही. बहुमताचा मॅजिक फिगर एक आणि दोन अंकानेच मिस झाल्याचे दिसून येते. राजकीय मुसद्देगिरी कमी पडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत असूनही काही ठिकाणी सत्तास्थापनेची संधी गमवावी लागली. या निकालामुळे या दोन्ही पक्षातील नैराश्यात आणखी भर पडली आहे.
दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सहा ठिकाणी ढोलतशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक काढली. पहिल्यांदाच नगराध्यक्ष विराजमान होत असल्याने प्रत्येक ठिकाणी उत्सुकता दिसत होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर आत जयपराजयाचे कवित्व सुरू झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Alliance of five municipalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.