नगरपंचायतीवरील सत्तेसाठी युती-आघाडीत रस्सीखेच

By Admin | Updated: November 4, 2015 02:36 IST2015-11-04T02:36:58+5:302015-11-04T02:36:58+5:30

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे निकाल हाती आल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता

Alliance with the alliance for the power of the Nagar Panchayat | नगरपंचायतीवरील सत्तेसाठी युती-आघाडीत रस्सीखेच

नगरपंचायतीवरील सत्तेसाठी युती-आघाडीत रस्सीखेच

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे निकाल हाती आल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. त्यासाठी कुठे युती तर कुठे आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
सहा नगरपंचायतींपैकी बाभूळगावमध्ये भाजपा-सेनेची युती तर झरीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. राळेगाव नगरपंचायतीवर भाजपाचा भगवा फडकला आहे. १७ पैकी १० जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. महागावात परिवर्तन विकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळाच आहे. कळंबमध्ये सेनेने सत्तेचा दावा केला आहे. मात्र त्यांना आणखी चार जणांची साथ हवी आहे. भाजपाशी युती झाल्यास ही अडचण दूर होईल. मात्र तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीला अपक्षासह एकत्र येऊनही नऊचा आकडा गाठता येत नाही.
मारेगावमध्ये सुद्धा सेनेला सत्ता स्थापनेची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना भाजपा व दोन अपक्षांची मदत घ्यावी लागेल. एखाद वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष असे समीकरणही जुळण्याची शक्यता नाकारता येत नाही. झरीमध्ये सर्वाधिक सात जागा मिळाल्याने भाजपा सत्तेच्या अगदी जवळ असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे गणितही जुळविले जाऊ शकते. अपक्षांमध्ये काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार यांना मानणारेही सदस्य आहेत. बाभूळगावमध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेची चिन्हे दिसू लागली आहे. काँग्रेसच्या सात जागा असून त्यांना सत्तेसाठी आणखी दोघांची साथ हवी आहे. मात्र भाजपा-सेना युतीच्या सहा जागा असून तीन अपक्ष त्यांच्या गळाला लागल्यास तेथे युतीच्या सत्तेचा मार्ग सुकर होऊ शकतो.
शिवसेनेने कळंब व मारेगावचे नगराध्यक्षपद पटकाविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. बाभूळगावात सेना नगर उपाध्यक्षपदावर दावा सांगू शकते. भाजपाचा राळेगावात नगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे. झरीमध्येही भाजपाचाच नगराध्यक्ष होऊ शकतो. बाभूळगावात काँग्रेस विचाराच्या सदस्याला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत आरुढ करण्यासाठी प्रा.वसंत पुरके यांचे प्रयत्न सुरू आहे. सध्याचे चित्र पाहता सहा पैकी दोन नगरपंचायती सेनेकडे, दोन भाजपाकडे, एक परिवर्तनकडे तर एक काँग्रेसकडे राहण्याची चिन्हे आहेत. मात्र सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ‘आमच्यासाठी सर्वच पर्याय खुले’ असल्याचे स्पष्ट केल्याने एखादवेळी युती व आघाडीतील सदस्य एकमेकांच्या मदतीला धावून वेगळेच समीकरण मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Alliance with the alliance for the power of the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.