बिरसा ब्रिगेडवर ‘दुकानदारी’चा आरोप
By Admin | Updated: August 28, 2015 02:38 IST2015-08-28T02:38:13+5:302015-08-28T02:38:13+5:30
आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव ३० आॅगस्ट रोजी यवतमाळात होत आहे. मात्र शासनाचा निधी घेऊन बिरसा ब्रिगेड ही संघटना स्वत:च श्रेय घेत असल्याचा आरोप ...

बिरसा ब्रिगेडवर ‘दुकानदारी’चा आरोप
यवतमाळ : आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव ३० आॅगस्ट रोजी यवतमाळात होत आहे. मात्र शासनाचा निधी घेऊन बिरसा ब्रिगेड ही संघटना स्वत:च श्रेय घेत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, विद्यार्थी परिषदेसह आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी केला.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या नेतृत्वात गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सवाच्या आयोजकांवर विविध आरोप करण्यात आले. सुनील ढाले म्हणाले की, या महोत्सवासाठी राज्याचे आदिवासी मंत्री विष्णू सावरा पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. त्यांचे नाव सांगून जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आदिवासी वसतिगृहाकडून १५ हजार रुपये वसूल करीत आहे. महोत्सवाच्या आयोजकांनी एकप्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांची ही लूटच चालविली आहे. वास्तविक पाहाता, या महोत्सवाच्या आयोजनासाठी शासनाने १३ लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे, न्युक्लिअस बजेटमधून हा निधी मिळविण्यासाठी आमदार अशोक उईके यांनीच पत्रही लिहिले होते. असे असताना वसतिगृहांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखून ठेवलेले १५ हजार उकळण्याचे काम महोत्सवाचे आयोजक करीत आहेत. विद्यार्थी एकता महोत्सव असताना जिल्ह्यातील कोणत्याही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, अशी माहिती विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रफुल्ल गेडाम यांनी दिली.
हा कार्यक्रम शासकीय असला तरी कोणतेही शासकीय नियम पाळण्यात आले नाही. केवळ बिरसा ब्रिगेड या एकाच संघटनेने सर्व आयोजनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, औपचारिकता म्हणून काही विद्यार्थ्यांचे फोटो महोत्सवाच्या बॅनरवर लावण्यात आले. त्याबाबतही विद्यार्थ्यांना विचारण्यात आले नाही, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी वसतिगृहातील ३० आॅगस्टचे जेवणही कार्यक्रमस्थळीच ठेवण्यात आले आहे. आदिवासी समाजाचा केवळ गर्दी जमविण्यासाठीच वापर करणार काय? असा संतप्त सवालही विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव म्हणजे काही लोकांचा केवळ राजकीय स्टंट आहे. विद्यार्थ्यांच्या भरवशावर काही लोकं स्वत:ची राजकीय भाकर भाजून घेण्याची धडपड करीत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत सुनील ढाले यांनी केला.
पत्रकार परिषदेत उपस्थित प्रफुल्ल गेडाम, अविनाश मेश्राम, भूमिका कुमरे, धर्मेंद्र मेश्राम, संतोष टाले, मंगल टेकाम, संदीप इंगळे, अमन सोयाम, अरविंद बोलके, अंकुश मडावी, राहुल मडावी, मंगल वडदे, उषा काळे, जयश्री पेंदाम, प्रियंका पुसाम, जीवन आत्राम, किशोर येडमे, सतीश आडे, धनराज मडावी, स्वप्नील बोलके, दत्ता काळे, उशांगी आत्राम, मिनल इनवते, स्नेहा कोडापे, सतीश आत्राम, अमोल सोयाम आदींनी महोत्सवाच्या आयोजकांचा निषेध केला. (स्थानिक प्रतिनिधी)