जिल्हा परिषदेत सर्वांना ‘गणवेश’
By Admin | Updated: July 11, 2016 02:17 IST2016-07-11T02:17:04+5:302016-07-11T02:17:04+5:30
जिल्हा परिषदेत सोमवारपासून शाळा भरल्याचे चित्र दिसून येणार आहे. कर्मचाऱ्यांंना गणवेश सक्ती करण्यात आल्यामुळे ....

जिल्हा परिषदेत सर्वांना ‘गणवेश’
निर्णय : आजपासून ‘ड्रेस कोड’ लागू, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
यवतमाळ : जिल्हा परिषदेत सोमवारपासून शाळा भरल्याचे चित्र दिसून येणार आहे. कर्मचाऱ्यांंना गणवेश सक्ती करण्यात आल्यामुळे सोमवारपासून सर्व कर्मचारी एकाच गणवेशात कार्यालयात पोहोचणार आहे. गणवेश परिधान करून न आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या सप्ताहापासूनच करावयाची होती. त्यानुसार काही कर्मचारी गेल्या सोमवारीच नवीन गणवेशात आपापल्या कार्यालयातन पोहोचले. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोडला बगल दिली. टेलरने गणवेश शिवूनच दिला नाही, असा सोयीस्कर बहाणा त्यांनी शोधला. तथापि आता असा कोणताही बहाणा चालणार नाही. त्यामुळे सोमवार ११ जुलैपासून सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गणवेशातच आपापल्या कार्यालयात पोहोचावे लागणार आहे.
कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आल्यामुळे आता जिल्हा परिषदेत शाळा भरल्याचे चित्र निर्माण होणार आहे. आत्तापर्यंत नागरिकांना केवळ शाळेत विद्यार्थी आणि काही खासगी कंपन्यांमध्येच गणेशातील कर्मचारी दिसून येत होते. हे चित्र उद्यापासून पालटणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार आहे. त्यामुळे कर्मचारी ओळखणेही सोपी होणार आहे. विशेष म्हणजे गणवेशातील कर्मचाऱ्यांना चहा टपरीवर शोधणेही सोपे होणार आहे. अनेक कर्मचारी कार्यालयीत वेळातही चहा टपरीवर गप्पा हाकताना दिसतात की नाही, हे सुद्धा आता स्पष्ट होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंनी धाडसी निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती केली. कर्मचाऱ्यांनी सुरूवातीपासून त्याला नाके मुरडली. गणवेशात असल्यानंतर चहा, पान टपरीवर निवांत बसून गप्पा हाकणे, या निर्णयामुळे कठीण जाईल, असा कदाचित त्यांचा कयास असावा. तथापि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला निर्णय ठामपणे कायम ठेवला. त्यापुढे कर्मचाऱ्यांचे काहीच चालले नाही.
परिणामी आता कर्मचाऱ्यांना गणवेशातच आपल्या कार्यालयात पोहोचावे लागणार आहे. यामुळे काही मातब्बर कर्मचाऱ्यांना झटका बसणार आहे. हे कर्मचारी आत्तापर्यंत स्वत:लाच संबंधित विभागाचे ‘बॉस’ समजत होते. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता एकाच गणवेशात आपल्या खुर्चीत स्थानापन्न व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील अधिकाऱ्याची कुचंबणा होण्याची शक्यता आहे.
(शहर प्रतिनिधी)
कर्मचारी नेत्यांना बसणार चाप
जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी संघटना कार्यरत आहेत. त्यांचे पदाधिकारी विविध विभागात काम करतात. काही संघटनांचे पदाधिकारी नेहमी तोऱ्यातच असतात. ते अधिकाऱ्यांसारखे वागतात. काही पदाधिकाऱ्यांचा खास राजकीय नेत्यांप्रमाणे पेहराव असतो. आता मात्र त्यांनाही चाप बसणार आहे. त्यांनाही गणवेशातच कार्यालयात यावे लागणार आहे. परिणामी कर्मचारी नेते आणि त्यांच्या संघटनांमधील सदस्य असलेले कर्मचारी, एकाच गणवेशात आढळणार आहे. यामुळे संबंधित कर्मचारी नेते आणि त्यांच्या कार्यकर्ते असलेल्या सदस्यांमधील रूंदावलेली दरी कमी होण्याची शक्यता आहे. तथापि कर्मचारी नेत्यांना मात्र काही काळ ओशाळल्यागतच होणार आहे. त्यांची पदाधिकारीपणाची ‘खुमखुमी’ चांगलीच जिरण्याची शक्यता आहे. हे पदाधिकारी आणि त्यांचे सदस्य सारख्याच गणवेशात राहणार असल्याने त्यांच्या संघटनेची ‘एकात्मता’ वाढण्यास मदत मिळणार आहे.