एमआयएम लढविणार सर्व नगरपालिका

By Admin | Updated: October 22, 2016 01:35 IST2016-10-22T01:35:44+5:302016-10-22T01:35:44+5:30

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी निवडणुका होत असून एमआयएम प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे.

All the municipalities fighting MIM | एमआयएम लढविणार सर्व नगरपालिका

एमआयएम लढविणार सर्व नगरपालिका

शाज अहमद : असदुद्दीन ओवेसी घेणार यवतमाळात सभा
यवतमाळ :जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी निवडणुका होत असून एमआयएम प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी नोव्हेंबरमध्ये यवतमाळात जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती एमआयएमचे यवतमाळ अध्यक्ष शाज अहमद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यवतमाळसह उमरखेड, पुसद, वणी, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, आर्णी या आठही नगरपालिकांसाठी आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलेमिन (एमआयएम) उमेदवार देणार आहे. उमेदवारीसाठी अनेक नावे आली असून अद्याप नावांबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यवतमाळ शहरातील १० प्रभागांमध्ये उमेदवार देण्यात येणार आहेत. त्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये दलित उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याचे शाज अहमद म्हणाले. नगरपालिकांच्या निवडणुकांना सामारे जाताना आमचा थेट सामना बसपा आणि काँग्रेससोबतच राहील. त्यादृष्टीने आम्ही मुस्लिम, दलित आणि ओबीसी यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न करीत आहोत. दलित आणि ओबीसी समाजातील अनेक मान्यवरांनी आमच्यासोबत येण्याचे मान्य केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील उमेदवार ठरविण्याबाबत महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य सलीम हक पूर्ण लक्ष ठेवून आहेत. उमेदवार निवडीसाठी त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष सैयद मोईन खान ३ नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. यावेळी कळंब चौकात ते सभाही घेणार आहे. यवतमाळ शहरात अजूनही पाणीपुरवठा, रस्त्यांची वाईट अवस्था, घाण, वीजपुरवठा आदी समस्या कायम आहेत. त्यामुळे नगरपालिकेत आमचे सदस्य निवडून आणून या समस्यांवर मात करण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
एमआयएम हा पक्ष विकासाचा मुद्दा घेऊनच लोकांसमोर आलेला आहे. मात्र, काही शक्ती जाणीवपूर्वक या पक्षाला जातीवादी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुस्लिम समाजातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून त्यांना राजकारणात सक्रीय करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे साहित्यिक एजाज जोश यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला यवतमाळ अध्यक्ष शाज अहमद यांच्यासह साहित्यिक एजाज जोश, नजीर अहमद, एजाज अहमद, मोहम्मद फरहान, हाजी प्यारे साहेब, अकबर शादीक, डॉ. निजाबुद्दीन अन्सारी, इफ्तेकार अहेमद, राजू मलिक, तौफिक खान आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: All the municipalities fighting MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.