बॅंक घोटाळ्यातील चारही आरोपींचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST2021-04-10T05:00:00+5:302021-04-10T05:00:07+5:30
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कंत्राटीची सेवा संचालक मंडळाने संपुष्टात आणली असून इतर तिघांना निलंबित केले आहे.

बॅंक घोटाळ्यातील चारही आरोपींचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या चौघांनीही अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दारव्हा येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सुरुवातीला चौघांनाही अटकेबाबत अंतरिम दिलासा दिला होता. परंतु यातील मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी दारव्हा सत्र न्यायालयाने नाकारला आहे.
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कंत्राटीची सेवा संचालक मंडळाने संपुष्टात आणली असून इतर तिघांना निलंबित केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्णी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी चारही आरोपींनी दारव्हा येथील सत्र न्यायाधीश रामटेके यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अटक न करण्याबाबत अंतरिम दिलासा दिला होता. परंतु यातील अमोल मुजमुले रा. जवळा ता. आर्णी या लेखपालाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. महिला व्यवस्थापकाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी घेतली गेली. मात्र त्यावरील निर्णय पुढील तारखेवर दिला जाऊ शकतो. इतर दोघांच्याही अर्जावर सुनावणी होणार आहे. यातील घोटाळेबाजांना राजकीय आशीर्वाद असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
चौघांच्याही जामिनाला पोलिसांचा तीव्र आक्षेप
न्यायालयाने पोलिसांना ‘से’ मागितला असता चौघांनाही अटकपूर्व जामीन देण्यास तपास अधिकाऱ्याने न्यायालयात तीव्र विरोध दर्शविला.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून अनेक बाबींचा तपास करायचा आहे. या घोटाळ्यात आणखी कुणी सहभागी आहे का, रक्कम नेमकी कुठे गेली याचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे चारही आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शविला.
हा विरोध ग्राह्यधरुन अमोल मुजमुले याचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. इतर तिघांबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे नजरा लागल्या आहेत.