दिग्रस पालिका उपाध्यक्षपदी अजिंक्य मात्रे
By Admin | Updated: January 5, 2017 00:20 IST2017-01-05T00:20:09+5:302017-01-05T00:20:09+5:30
येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली.

दिग्रस पालिका उपाध्यक्षपदी अजिंक्य मात्रे
स्वीकृतची निवड लांबणीवर : सर्वसाधारण सभेची पुन्हा नोटीस काढणार
दिग्रस : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली. परंतु दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड मात्र लांबणीवर पडली. त्यामुळे स्वीकृत सदस्यांसाठी पुन्हा सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे.
दिग्रस नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार होती. सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी निवडीची प्रक्रिया सुरू केली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
स्वीकृत सदस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच सूचना न आल्याने मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी दुपारी ४ वाजेपर्यंत सभा तहकूब केली. परंतु यावर नूरमहमद खान, किशोर साबू, खुर्शिद बानो, के.टी. जाधव यांनी ४ वाजता सभा बोलविण्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाशी मुख्याधिकाऱ्यांनी संपर्क करावा, असे म्हटले. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आज स्वीकृत सदस्यांबाबत नगरपरिषदेला सूचना देण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. त्यामुळे ही सभा तहकूब झाली. स्वीकृत सदस्यांबाबत सर्वसाधारण सभेची नोटीस पुन्हा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ उपाध्यक्षांची निवड झाली. सभेला नगरसेवक उपस्थित होते.
स्वीकृत सदस्यांसाठी शिवसेनेतर्फे डॉ.संदीप दुधे, डॉ.अरविंद मिश्रा यांनी, काँग्रेसतर्फे रवींद्र अरगडे, अपक्ष सुभाषचंद्र अटल, रामदास पद्मावार यांनी अर्ज सादर केले. परंतु ही प्रक्रिया रखडल्याने शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. (शहर प्रतिनिधी)