नेर तालुक्यात पोषण आहाराची ऐशीतैशी
By Admin | Updated: May 9, 2015 00:00 IST2015-05-09T00:00:58+5:302015-05-09T00:00:58+5:30
उन्हाळ्याच्या सुटीतही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून खिचडीचे वाटप करण्याचे आदेश धडकले आहे...

नेर तालुक्यात पोषण आहाराची ऐशीतैशी
खिचडीचा वांदा : आदेश धडकले, मात्र साहित्यच उपलब्ध नाही
किशोर वंजारी नेर
उन्हाळ्याच्या सुटीतही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून खिचडीचे वाटप करण्याचे आदेश धडकले आहे. यासाठी शिक्षकांनीही आपली मानसिकता तयार केली आहे. मात्र पोषण आहारासाठीचे साहित्य अजूनही संबंधित शाळांवर पोहोचले नाही. शालेय पोषण आहार अधीक्षकांच्या दिरंगाईमुळे तालुक्यात सदर योजनेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप होत आहे.
उन्हाळ्याची सुटी कधी लागते याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह शाळेवर कार्यरत शिक्षक आणि कर्मचारी करत असतात. निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक ते कार्यरत असलेल्या गावातील शाळेकडे फिरकतही नाही. नवीन सत्रातच त्यांची हजेरी लागते. यावर्षी मात्र त्यांना उन्हाळ्याची सुटी असतानाही शाळेत दररोज हजेरी लावून खिचडीचे वाटप करावे लागणार आहे. सकाळी ९ ते १० या वेळात पटावरील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून खिचडीचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शिक्षकांचे उन्हाळ्यातील सुटीचे नियोजन कोलमडले आहे.
शिक्षकांना खिचडी वाटपाची सक्ती करण्यात आली असली तरी शालेय पोषण आहाराचे साहित्य मात्र शाळांपर्यंत पोहोचलेले नाही. तालुक्यात ९१ शाळा आहेत. यातील कुठल्याही शाळेमध्ये साहित्य पोहोचले नसल्याने खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. पोषण आहार अधीक्षक गेली काही दिवसांपासून रजेवर आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहार वितरणाचे नियोजन कोलमडले आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात अनियमितता
पोषण आहार अधीक्षक उपस्थित नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन गेली पाच महिन्यांपासून रखडले आहे. त्या वेतनासाठी शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. परिवाराला हातभार लावण्यासाठी या महिला खिचडी शिजविण्याचे काम करतात. मात्र वेतनच नसेल तर काम करून फायदा काय, असा प्रश्न त्यांचा आहे. या अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रस्तावच अधीक्षकांनी वरिष्ठांकडे पाठविला नसल्याची माहिती आहे.
पोषण आहार अधीक्षकांशी वारंवार संपर्क केला. कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र अधीक्षक दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळेच पोषण आहराचे साहित्य शाळांवर पोहोचू शकले नाही.
-प्रणीता गाढवे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नेर