ऐन उन्हाळ्यात भाजी स्वस्त
By Admin | Updated: May 7, 2015 01:43 IST2015-05-07T01:43:35+5:302015-05-07T01:43:35+5:30
उन्हाळा सुरू होताच भाज्यांचे दर कडाडतात. सकाळ-संध्याकाळच्या स्वयंपाकात कडधान्याची भाजी तयार होते.

ऐन उन्हाळ्यात भाजी स्वस्त
रूपेश उत्तरवार यवतमाळ
उन्हाळा सुरू होताच भाज्यांचे दर कडाडतात. सकाळ-संध्याकाळच्या स्वयंपाकात कडधान्याची भाजी तयार होते. यावर्षी मात्र दोन्ही वेळच्या जेवनात ताज्या भाज्यांचीच मेजवानी आहे. तब्बल १२ वर्षानंतर झालेला हा बदल आहे. ऐन उन्हाळ्यात गडगडलेल्या भाज्यांच्या दरामुळे गृहिणींचीही ‘कशाची भाजी करायची’ ही समस्या निदान यावर्षी तरी संपली आहे. उन्हाळ्यात ८० रुपये किलोवर जाणारे टमाटे यावेळी फक्त दहा रुपये किलोमध्ये मिळत आहे. इतर भाज्यांचिही स्थिती हीच आहे. नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रु तरळत आहे.
खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबीवर विसंबून होता. रबीतही गारपिटीसह वादळी वाऱ्याचा धोका असल्याने तत्काळ दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवडीला पहिली पसंती दिली. यातूनच भाजीपाल्याचे क्षेत्र कधी नव्हे ते चारपट वाढले. दोन हजार हेक्टरचे क्षेत्र १० हजार हेक्टरवर पोहोचले. यातून भाजीपाल्याची आवक बाजारात वाढत गेली. वादळी वारा आणि गारपिटीने भाजीपाला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना जमेल तेवढा भाजीपाला काढून विक्रीसाठी आणणे सुरू केले. दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला भाजी मंडित विक्रीसाठी येत आहे. यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील भाजीपाला यवतमाळच्या मंडीत येत आहे. सर्व बाबींचा परिणाम भाजीपाल्याचे दर गडगडण्यावर झाला आहे. २००३ मधील भाजीपाल्याच्या दरामधील घसरण आज पाहायला मिळत आहे. साधारणत: उन्हाळ्यात भाजीचे दर इतर हंगामाच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक असतात. यामुळे कमी कालावधीत शेतीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. दोन पैसे अधिक मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले खरे, मात्र त्यांच्या आशेवर घसरलेल्या दराने पाणी फेरले गेले. लहरी हवामानाचा फटका बसण्याची भीतीही आवक वाढण्यास कारणीभूत ठरली. उन्हाळ्यात भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असतात. आज १५ ते २० रुपये किलोमध्ये आहे.
शेतकरी म्हणतात, लागवड खर्चही निघत नाही
उन्हाळ्यातील उत्पादन आणि दर लक्षात घेत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड झाली. यास्थितीत ढगाळी वातावरणाने रोगाचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर झाला. त्याच्या नियंत्रणासाठी औषधांच्या फवारण्या करण्यात आल्या. अधिक उत्पादनासाठी खत टाकण्यात आले. असे असले तरी, भाजीपाल्याचे दर कवडीमोल असल्याने लागवड खर्च निघणेही कठीण असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लाडखेड येथील राजू दुधे म्हणाले, यावर्षी भाजीपाला पिकाने मोठी निराशा केली आहे. भर उन्हात पिकाला पाणी दिले. मात्र मेहनतीचे चिज झाले नाही. भाज्याचे दर असेच राहिल्यास पुढील वर्षी भाजीपाला घेण्यापासून शेतकरी दूर जातील. डोर्ली येथील अर्चित मानेकर म्हणाले, सोयाबीन, गहू झाला नाही म्हणून भाजीपाला लावला. वादळ वाऱ्याने भाजीचे मोठे नुकसान केले. यावर्षी चांगले दर मिळतील, अशी आशा होती. त्यावर पाणी फेरले गेले. रातचांदना येथील अरविंद बेंडे म्हणाले, यावर्षीचे भाजीचे दर कडाडतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातून शेतमाल आल्याने दर घसरले. याचा फटका स्थानिक भाजीपाला उत्पादकांना बसला. तिवसा येथील सुभाष शर्मा म्हणाले, शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी यापुढे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेणे फायद्याचे ठरेल.
विक्रेते म्हणतात, बाजारात ग्राहकच नाही
भाजीपाल्यांचे दर घसरल्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. स्वस्त भाजीपाला ग्राहक एकाचवेळी घेऊन जातात. यामुळे वारंवार दुकानाकडे होणाऱ्या चकरा कमी झाल्या आहे. भाजीपाल्याचा उठाव नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. शांता खंडारे म्हणाल्या, बाजारात सायंकाळच्या सुमारास राहणारी गर्दी सध्या कमी झाली आहे. पावाने खरेदी होणारी भाजी आता किलोने घेतली जात आहे. आशिष वाणी, बंडू तागडे, अनिल घायवान म्हणाले, बाजारात सध्या यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीसाठी येत आहे. यातून भाज्यांचे दर घसरले आहे. साधारणत: ३०० लोकांचा रोजगार भाजी विक्रीवर विसंबून आहे. दररोज दहा टन भाजी खरेदी होते.