शेती व्यवसायावर आली अवकळा
By Admin | Updated: January 24, 2015 23:03 IST2015-01-24T23:03:21+5:302015-01-24T23:03:21+5:30
शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़

शेती व्यवसायावर आली अवकळा
घोन्सा : शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़
पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, असा समाजाचा दृष्टीकोन होता़ त्यावेळी शेती हा व्यवसाय प्रत्येकाला परवडण्यासारखा होता़ त्यावेळी कापसाचा भाव आणि सोन्याचा भाव जवळपास सारखाच असायचा़ त्यामुळे शेती व्यवसायाला उत्तम म्हणून संबोधले जात होते़ परंतु सध्या परिस्थिती फारच बदलली आहे़ त्यामुळे आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, अशी अवस्था झाली आहे़ वाढलेली महागाई आणि शेतीमालाला भेटणारा तोकडा भाव, यामुळे शेती व्यवसायावर अवकाळ पसरली आहे़
गेल्या दोन वर्षांपासून शेती व्यवसाय अतिशय अडचणीत सापडला आहे़ मागीलवर्षी झालेला ओला दुष्काळ आणि त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान, यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला होता़ उत्पन्नामध्येही घट झाली होती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी जोमाने तयारी केली. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली. यावर्षीसुध्दा पाऊस आणि कमी भावामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे़ शेतीला लावलेला खर्चही यावर्षी निघू शकला नाही़ परिणामी शेतकरी विवंचनेत सापडले आहे़
याच वर्षी शेतकरी वर्गाच्या विकासाच्या गोष्टी सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नवीन सरकार स्थापन झाले़ परंतु या सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही़ शेती उत्पन्नाला योग्य तो भावसुध्दा मिळाला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसायावर अवकळा पसरत असल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)