अपघातग्रस्तांच्या जखमेवर कृषी विभागाचे मीठ
By Admin | Updated: February 20, 2015 01:52 IST2015-02-20T01:52:04+5:302015-02-20T01:52:04+5:30
नागपूर येथे वर्षभरापूर्वी आयोजित कृषी प्रदर्शनावरून परतीच्या प्रवासावर असलेल्या तालुक्यातील नांदगव्हा येथील शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला.

अपघातग्रस्तांच्या जखमेवर कृषी विभागाचे मीठ
लोकमत विशेष
संजय भगत महागाव
नागपूर येथे वर्षभरापूर्वी आयोजित कृषी प्रदर्शनावरून परतीच्या प्रवासावर असलेल्या तालुक्यातील नांदगव्हा येथील शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले. शासनाने मदत घोषीत करूनही अद्यापपर्यंत पूर्ण रक्कम मिळाली नाही. जखमी शेतकऱ्यांचे कुटुंबिय प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे.
नागपूर येथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील नांदगव्हाण येथील शेतकरी गेले होते. ११ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. चार जण जागीच ठार झाले तर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मृतांच्या वारसाला पाच लाख रुपये तर जखमीला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी मृतांच्या वारसांना मदत मिळाली, मात्र सात जखमींपैकी पाच शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयापर्यंतच मदत मिळाली.उर्वरित दीड लाख रुपये मदत अद्यापही मिळाली नाही. तसेच बालू फरीदा पवार आणि पूनमचंद राठोड या जखमी शेतकऱ्यांना तर एक रुपयाही मिळाला नाही.
जखमी शेतकऱ्यांचा अहवाल यवतमाळ कृषी विभागाने सहसंचालक निधी व लेखा विभागाला पाठविलाच नसल्याची गंभीर बाब वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर उघडकीस आली. जखमींपैकी दोन शेतकऱ्यांच्या नावाची नोंदच नाही. तर उर्वरित पाच शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली. आता या घटनेला वर्ष झाले आहे. परंतु कृषी विभाग जखमी शेतकऱ्यांच्या जखमीवरच मिठ चोळत आहे. या शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल हे स्पष्ट नसल्याने संताप व्यक्त होत आहे.