कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: February 16, 2017 00:13 IST2017-02-16T00:13:47+5:302017-02-16T00:13:47+5:30
येथील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली.

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
दारव्हा येथील घटना : वणी येथील रहिवासी, कमी गुण मिळाल्याची खंत
दारव्हा : येथील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास येथील कवितानगरात घडली. प्रतिमा प्रकाश कुचनकर (२१) रा. वणी असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ती येथे गोविंदराव खाडे यांच्या घरी भाड्याने खोली करून राहत होती.
मंगळवारी दुपारी ही विद्यार्थिनी तिच्या वणी येथील घरुन दारव्हा येथे आली होती. ५.३० वाजताच्या सुमारास तिने आपण दारव्हा येथे पोहोचल्याचे फोन करून घरी सांगितले होते. रुममधील मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर दार आतून बंद करून स्लॅबच्या हुकला ओढणीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. मैत्रिणी बाहेरुन आल्यानंतर दार आतून बंद असल्याचे आणि कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावले असता सदर युवती गळफास लावलेल्या स्थितीत आढळली.
दोन दिवसांपूर्वी कृषीच्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल लागला. यात प्रतिमाला एका विषयात कमी गुण मिळाले. त्यामुळे ती अस्वस्थ होती, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे करीत आहे. (प्रतिनिधी)