शेतकी साहित्य गोदामातच पडून

By Admin | Updated: July 10, 2015 02:19 IST2015-07-10T02:19:24+5:302015-07-10T02:19:24+5:30

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वाटपाअभावी स्प्रिंकलर पाईप व अन्य साहित्य पडून आहे.

Agricultural material fell into a godown | शेतकी साहित्य गोदामातच पडून

शेतकी साहित्य गोदामातच पडून

समाज कल्याण : पुरवठादाराचे ४६ लाख थकीत, १४ लाखांचा हिशेबच लागेना
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वाटपाअभावी स्प्रिंकलर पाईप व अन्य साहित्य पडून आहे. याबाबत खुद्द समाज कल्याण सभापतींनी नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकाऱ्यांनीही अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. दरम्यान, समाज कल्याण विभागाने मात्र या साहित्याचे खापर लाभार्थ्यांवरच फोडले असून त्यांनी ते न नेल्याने पडून असल्याचे म्हटले आहे.
समाज कल्याण खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या नागरिकांकरिता साहित्य पुरवठ्याच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यात स्प्रिंकलर पाईप, पॉवर स्प्रे, डिझेल इंजीन आदी साहित्याचा समावेश आहे. या बहुतांश योजना ९० टक्के अनुदानावरील असतात. या योजनांच्या अनुषंगाने शासनाच्याच विविध एजन्सीकडून साहित्याची खरेदी केली जाते. मात्र पुरवठा झालेले हे साहित्य वर्षानुवर्षे पंचायत समित्यांच्या गोदामात पडून राहते. लाभार्थ्यांना नियोजित वेळेत त्याचे वाटप होत नाही. पर्यायाने हे साहित्य कालबाह्य होते, तर अनेक साहित्याची तुटफुट होते. स्प्रिंकलरचे असेच काळे पाईप गोदामात पडून असून ते फुटल्याची बाब जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती लता खांदवे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या साहित्याबाबत खोलवर माहिती घेतली असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या.
समाज कल्याण खात्याने विविध साहित्य पुरवठा करणाऱ्या शासनाच्या एजन्सीला सन २०११ पासून देयकच दिले नाही. या देयकापोटी सुमारे ४६ लाख रुपये चार वर्षांपासून थकीत आहेत. यातील ३२ लाख रुपये हे ९० टक्के अनुदानाच्या रकमेचे आहे, तर १४ लाख रुपये हे १० टक्के लाभार्थी हिस्स्याचे आहेत. लाभार्थी हिस्स्याची ही रक्कम समाज कल्याण विभागाने पंचायत समितीस्तरावर वसूल केली. मात्र आता त्याचा हिशेबच लागत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. तीन वर्षांपासून या रकमेचा हिशेब जुळविणे सुरू आहे. त्यामुळे सन २०११ पासूनचे सर्व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी कार्यप्रणालीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरवर्षी होणाऱ्या लेखा परिक्षणात ही गंभीर बाब निदर्शनास आली नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ही रक्कम मिळावी म्हणून पुरवठादाराने आतापर्यंत समाज कल्याणला तब्बल १२ स्मरणपत्रे पाठविल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Agricultural material fell into a godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.