पुन्हा भूमिपूजनांचा धडाका
By Admin | Updated: August 17, 2014 23:25 IST2014-08-17T23:25:18+5:302014-08-17T23:25:18+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा गावागावांत पुढाऱ्यांनी लावला होता. आता विधानसभेच पडघम वाजायला सुरूवात होताच विद्यामान आमदार आणि इच्छुक

पुन्हा भूमिपूजनांचा धडाका
चाहूल विधानसभेची : पांढरकवड्यात संगीत रजनी
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा गावागावांत पुढाऱ्यांनी लावला होता. आता विधानसभेच पडघम वाजायला सुरूवात होताच विद्यामान आमदार आणि इच्छुक जनतेत जाण्यासाठी कोणतही संधी सोडत नाही. त्यातून गावागावांत पुन्हा भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे.
विधानसभेची आचार संहिता लागल्यानंतर दिलेल्या आश्वसनाची पूर्ती करणे शक्य होणार नाही. म्हणून भूमिपूजन करून काम करणार याचे टोकण जणू ही नेते मंडळी देताना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या आमदारांची रेलचेल आहे. विधानसभेचे सात आणि विधान परिषदेचे चार आमदार आहेत. दोन तालुक्याला एक आमदार वाटून घेतला तरी ते सहज शक्य आहे. विधान परिषदेचेही आमदार आपला निधी विकास कामावर खर्ची घालत आहे. त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात चांगलीच भर पडली आहे.
ज्यांच्याकडे वाटण्यासाठी शासनाचा निधी नाही, अशी आमदारकीस इच्छूक असलेली मंडळी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहे. आर्णी विधानसभेतून इच्छूक असलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याने चक्क स्वखर्चाने संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी खास पुणे आणि मुबंई येथून कलावंत आणले.
या कार्यक्रमाची पत्रिका छापतांना स्थानिक खासदार आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नावा वापर करण्यात आला. आजपर्यंत जी व्यक्ती कधीच दिसली नाही. ती एकदम पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नावाने कार्यक्रम कसा काय घेते, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला. त्यांनी ही बाब खासदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची वेळ त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आली. पांढरकवड्यानंतर, घाटंजी आणि आर्णी येथे संगीत रजनी घेण्यात येणार होती. कानउघाडणी झाल्याने त्या इच्छूक उमेदवाराला गाशा गुंडाळावा लागला.
विशेष म्हणजे प्रस्थापित मंत्र्या विरोधात अच्छे दिन असलेल्या पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर आपल्याला कोणी विचारणार स्पर्धक नसल्याने येथीलच इरसाल कार्यकर्त्यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्याला निवडणुकीसाठी उभे राहण्याचा सल्ला दिला. मात्र सध्यातरी त्यांचा संपूर्ण कार्यक्रम बिचकला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)