ट्रक मागे घेताना दुचाकी चिरडून बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:15 IST2017-12-10T23:15:21+5:302017-12-10T23:15:44+5:30
रस्ता दुरुस्तीच्या कामावरील ट्रक मागे घेताना दुचाकी मागील चाकात चिरडल्या गेल्याने झालेल्या अपघातात बालिका ठार.

ट्रक मागे घेताना दुचाकी चिरडून बालिका ठार
आॅनलाईन लोकमत
झरीजामणी : रस्ता दुरुस्तीच्या कामावरील ट्रक मागे घेताना दुचाकी मागील चाकात चिरडल्या गेल्याने झालेल्या अपघातात बालिका ठार. तर तिचे वडील आणि बहीण गंभीर जखमी झाले. हा अपघात झरी तालुक्यातील मांगली गावाजवळ घडला. या अपघाताने संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांच्या काचाची तोडफोड केली.
खुशी दिनकर निखार (१२) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर दिनकर निखार (४०) आणि नंदिनी निखार (१४) रा. मांगली ता. झरी असे जखमी वडील आणि मुलीचे नाव आहे. मांगली येथील दिनकर निखार रविवारी आपल्या दुचाकीने दोन मुलींसह शेतात जात होते. त्यावेळी पैनगंगा नदी मार्गावर रेती भरलेला टिप्पर खड्डे बुजविण्यासाठी रेती टाकत मागच्या दिशेने येत होता. अचानक ट्रक दुचाकीच्या समोर आला. त्यावेळी मागच्या बाजूला मोठा खड्डा असल्याने दुचाकी वळविता आली नाही आणि ट्रकच्या मागील चाकात दुचाकी सापडली. त्यात खुशीचा जागीच मृत्यू झाला तर नंदिनीचा पाय फ्रॅक्चर झाला. दिनकर निखार गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना तत्काळ वणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी काही वाहनांच्या काचाची तोडफोड केली. कंत्राटदार येईपर्यंत प्रेत उचलणार नाही, अशी भूमिका मांगला व परिसरातील नागरिकांनी घेतली.