शासकीय नोकरीची मौखिक परीक्षा बाद
By Admin | Updated: October 29, 2014 22:56 IST2014-10-29T22:56:14+5:302014-10-29T22:56:14+5:30
नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय

शासकीय नोकरीची मौखिक परीक्षा बाद
गुणांवर निवड : ग्रामविकास विभागाचा आदेश धडकला
यवतमाळ : नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय नोकरीतून बाद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या परीक्षेच्या गुणांकनावरून त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
शासकीय नोकरीत एक जागा आणि हजारो अर्ज अशी स्थिती नेहमीच असते. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेतूनच लेखी परीक्षा आणि त्यानंतर मौखिक परीक्षा असे प्रकार पुढे आले. या दोनही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून शासकीय नोकरी दिली जायची. मात्र परीक्षेत अधिक गुण असलेले विद्यार्थीही तोंडी परीक्षेत कमी गुण घ्यायचे. त्यामुळे त्यांची निवड होत नव्हती. यामध्ये गैरप्रकारालाही मोठा वाव होता. परंतु आता केवळ लेखी परीक्षेच्या आधारावरच नोकरी मिळणार असल्याने गैरप्रकारालाही आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी, आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानुसार २०० गुणांची परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवाराची निवड करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पाठविले आहे. जिल्हा परिषदेची जम्बो भरती होत आहे. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. याच सुमारास गट क आणि गट ड पदाच्या भरतीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मौखिक परीक्षा रद्द झाल्याने गैरप्रकाराला तर आळा बसणारच आहे तसेच या परीक्षेचा तणावही नाहिसा झाला आहे. (शहर वार्ताहर)