सासूच्या खुनानंतर सुनेने जाळून घेतले

By Admin | Updated: August 12, 2014 23:59 IST2014-08-12T23:59:36+5:302014-08-12T23:59:36+5:30

जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या

After the murder of mother-in-law, they were burnt to death | सासूच्या खुनानंतर सुनेने जाळून घेतले

सासूच्या खुनानंतर सुनेने जाळून घेतले

दोन विधवांच्या खुनाचे गूढ कायम : मोबाईलवर तपास केंद्रित
वणी/कळंब : जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या कान्होली येथे सासूच्या खुनाच्या घटनेनंतर मंगळवारी दुपारी तिच्या सुनेने घरातच जाळून घेतले. ती मृत्यूशी झुंज देत आहे.
कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत कान्होली येथे सुमन महादेव राऊत (५७) या महिलेचा खून करून प्रेत शेतात अर्धवट स्थितीत पुरण्यात आले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच सदर महिलेची सून शुभांगी संदीप राऊत (३०) हिने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ९० टक्के जळालेल्या अवस्थेत तिला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अस्पष्ट आहे. सोमवारी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर कळंब पोलिसांनी मृत महिला सुमन हिचा मुलगा संदीप व सून शुभांगी यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते. सायंकाळपर्यंत बसवून ठेवून नंतर सोडून देण्यात आले. याच घटनेवरून पती-पत्नीत खटका उडाला असावा व त्यातूनच शुभांगीने पेटवून घेतले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. राऊत कुटुंबीय एकत्रच राहत असले तरी सून व सासू यांच्यात गेल्या चार वर्षांपासून अबोला असल्याचे गावात सांगितले जाते. शुभांगीचे माहेरही कान्होली गावातच आहे. संदीपकडे स्वत:ची शेती नाही. तो कष्टाळू आहे. दरवर्षी मक्त्याने शेती करायचा. यावर्षीही त्याने पेंदोर यांची शेती मक्त्याने केली होती. याच शेतीवर ८ आॅगस्ट रोजी शुभांगी आणि सासू सुमन सोबत गेल्या होत्या. मात्र परतताना केवळ शुभांगीच घरी आली. सासूला चकव्याने जंगलात नेले असावे, अशी बतावणी तिने केली. त्यानंतर संदीप व गावकऱ्यांनी सुमनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
कळंब पोलीस ठाण्यातही सुमन राऊत यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद देण्यात आली होती. दरम्यान, एका शेतात सुमनचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खुनामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
वणी येथील साईनगरीत कल्पना जोनलवार या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह दिवाणमध्ये लपविण्यात आला होता. या खुनामागील रहस्यही अद्याप उलगडलेले नाही. कल्पना यांचा मोबाईल बेपत्ता आहे. त्याद्वारेच सुगावा लागू शकेल, म्हणून पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे स्वत: वणीत तळ ठोकून आहेत. घटनास्थळावरील स्थिती पाहता मारेकरी कल्पना यांच्या संमतीनेच घरात आला असावा, तो त्यांचाच कुणी निकटवर्तीय असावा, असा संशय पोलिसांना आहे. कल्पना यांचा मुलगा मध्य प्रदेशात गेला. ९ आॅगस्टला सायंकाळी त्याचे आईसोबत मोबाईलवर बोलणेही झाले होते. मात्र खुनानंतर मोबाईलच बेपत्ता आहे. यातील मारेकरी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास वणीचे ठाणेदार गुलाब वाघ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: After the murder of mother-in-law, they were burnt to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.