दिवटे टोळीवरील ‘मोक्का’ अखेर मुंबईत खारीज
By Admin | Updated: December 20, 2014 02:11 IST2014-12-20T02:11:08+5:302014-12-20T02:11:08+5:30
बहुचर्चित गुंठा राऊत खुनात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दिवटे टोळीतील १४ सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार करण्यात आला.

दिवटे टोळीवरील ‘मोक्का’ अखेर मुंबईत खारीज
यवतमाळ : बहुचर्चित गुंठा राऊत खुनात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दिवटे टोळीतील १४ सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक के.एम. बिष्णोई यांनी फेटाळून लावला. दिवटे टोळीवरील मोक्का खारीज झाल्याने दोन टोळ््यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी पिंपळगाव परिसरातून गौरव उर्फ गुंठा राऊत या गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या तरूणाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या खुनाचे रहस्य उलगडल्यानंतर प्रवीण दिवटे याच्यासह १४ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच १४ पैकी ११ जणांना अटक करण्यात आली. या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला. पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.एस. महाजन यांच्याकडे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दिवटे टोळीने गेल्या वर्षभरात आणि त्यापूर्वी केलेल्या गंभीर गुन्ह्यांची जुळवाजुळव करून हा प्रस्ताव तयार केला गेला. ९ डिसेंबरला हा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.
अप्पर पोलीस महासंचालक के.एन बिष्णोई यांच्याकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी दिला गेला. त्यांनी याप्रस्तावाची पडताळणी करून मोक्का विचाराधिन असलेल्या दिवटे टोळीने केलेल्या संपत्तीविषयक गुन्हे आणि बेकायदेशीर कृत्यात (पीक्युलरी गेन आणि कन्टीन्युटी आॅफ अनलॉफूल अॅक्टीव्हीटी) सातत्य नसल्याचा निर्वाळा देऊन मोक्काचा प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान मोक्का खारीज व्हावा म्हणून दिवटे टोळीच्यावतीनेही तयारी सुरू होती. अॅड़ राजेश साबळे यांच्यामार्फत त्यांनीमोक्का विशेष न्यायालयात खारीज अर्जही केला होता. (स्थानिक प्रतिनिधी)