आर्यरूप पाठोपाठ केबीसीनेही गंडविले
By Admin | Updated: July 23, 2014 23:49 IST2014-07-23T23:49:12+5:302014-07-23T23:49:12+5:30
आर्यरुप टुरिझमने केलेल्या फसवणुकीचा सीआयडी तपास सुरू असतानाच आता केबीसी कंपनीचा घोटाळा पुढे आला. या कंपनीने विदर्भ-मराठवाडा सीमेवरील शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घातला.

आर्यरूप पाठोपाठ केबीसीनेही गंडविले
‘सीआयडी’ला विचारणा : जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल नाही, पोलिसांना तक्रारी दाखल होण्याची प्रतीक्षा
यवतमाळ : आर्यरुप टुरिझमने केलेल्या फसवणुकीचा सीआयडी तपास सुरू असतानाच आता केबीसी कंपनीचा घोटाळा पुढे आला. या कंपनीने विदर्भ-मराठवाडा सीमेवरील शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घातला.
केबीसी या खासगी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्याचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील गुंतवणूकदारांना बसला आहे. नाशिक भागात आतापर्यंत सात हजारांवर तक्रारकर्ते पुढे आले आहेत. केबीसीने राज्यभरच एजंटांमार्फत आपले जाळे पसरविले होते. रोख कमिशनचे आमिष दाखवून आधी एजंट नेमले गेले. नंतर याच एजंटांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लक्ष्य केले गेले. केबीसीवर आणि त्यांच्या एजंटांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी आपली आयुष्याची पुंजी या कंपनीत गुंतविली. परंतु केबीसीने आता गाशा गुंडाळला आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्याचे तालुके केबीसीच्या जाळ्यात अडकले. उमरखेड, महागाव, पुसद तसेच मराठवाड्यातील किनवट, माहूर, हातगाव, कळमनुरी या तालुक्यात केबीसीने फसवणूक केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही केबीसीने अनेकांना गंडा घातला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, सध्या शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गृहिणी आणि विशेषत: शिक्षकांच्या पत्नीला केबीसीने एजंट बनविले. त्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला गेला. केबीसीने फसवणूक केल्याचे उघड होऊनही अद्याप कुणीच तक्रार नोंदविण्यासाठी पुढे न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केबीसीने फसविल्याचे अनेक जण खासगीत सांगतात. परंतु प्रत्यक्षात पोलिसात तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. सुशिक्षित असूनही फसविले गेले म्हणून समाजात बदनामी होण्याच्या भीतीने कित्येक लोक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तर अनेकांनी काळापैसा गुंतविल्याने तेही चौकशीचा ससेमिरा उलटा फिरण्याच्या भीतीने पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची हिंमत दाखवित नसल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात केबीसीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी किती गुन्हे दाखल आहेत याची विचारणा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सीआयडीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली. परंतु जिल्ह्यात केबीसीकडून फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल नसल्याचा अहवाल पोलिसांनी सीआयडीला सादर केला.
यापूर्वी आर्यरुप टुरिझम कंपनीने तीन महिन्यात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. आर्यरुपनेही मराठवाड्याच्या सीमेवरील तालुक्यांनाच अधिक लक्ष्य केले होते. या प्रकरणात पुसद, घाटंजी येथे गुन्हे नोंदविले गेले. या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे. केबीसीमार्फत झालेल्या फसवणुकीची पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी यांना माहिती असली तरी प्रत्यक्ष कारवाईसाठी गुन्हा दाखल होण्याची, तक्रारदार पुढे येण्याची प्रतीक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)