तब्बल ३० तासानंतर तो उतरला टावरखाली
By Admin | Updated: October 31, 2015 00:27 IST2015-10-31T00:27:02+5:302015-10-31T00:27:02+5:30
शेतजमिनीच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यातील टॉवरवर चढून बसलेला श्याम गायकवाडला खाली उतरविण्यात तब्बल ३० तासानंतर यश आले.

तब्बल ३० तासानंतर तो उतरला टावरखाली
सुटकेचा नि:श्वास : अतिक्रमित शेत जमिनीची मोजणी
दिग्रस : शेतजमिनीच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यातील टॉवरवर चढून बसलेला श्याम गायकवाडला खाली उतरविण्यात तब्बल ३० तासानंतर यश आले. रात्रभर तो टॉवरवरच बसून असल्याने प्रशासनाचे पाचावर धारण बसली होती. अखेर आज शेत जमिनीच्या मोजणीला प्रारंभ झाल्याने दुपारी १२ वाजता तो टॉवरवरून खाली उतरला आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
तालुक्यातील इसापूर येथील शाम गायकवाड या तरुणाने गुरुवारी सकाळी टॉवरवर चढून वीरूगिरी सुरू केली होती. सोबत नेलेल्या ध्वनीक्षेपकावरून तो प्रशासनानी संवाद साधत होता. दुपारपर्यंत दुर्लक्ष केलेल्या प्रशासनाची सायंकाळपासून मात्र धावपळ सुरू झाली. अंधार पडायला लागला तरी श्याम खाली उतरायचे नाव घेत नव्हता. त्याच्या आईला पाचारण करून त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. परंतु श्याम काही केल्या कुणाचे ऐकत नव्हता. तो रात्रभर या टॉवरवरच बसून होता. रात्री ढगाळ वातावरण आणि वेगाने वाराही वाहत होता. अशा धोकादायक स्थितीत श्यामचे काही बरे वाईट झाले तर अशी धास्तीही प्रशासनाला होती. रात्रभर प्रशासनातील अधिकारी त्याच्यावर नजर ठेऊन होते. शुक्रवारचा दिवस उजाडला तरी श्याम टॉवरवरच बसून होता. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला होता. शेवटी प्रशासनाने त्याच्या मागण्या मान्य केल्या.
तहसीलदार नितीन देवरे यांनी इसापूर ग्रामपंचायतीकडून मोजणीसाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिक्रमित शेतजमिनीच्या ठिकाणी पाचारण केले. मोजणीची प्रक्रिया सुरू झाली. तसा निरोप श्यामला टॉवरवर देण्यात आला. आता आपली मागणी पूर्ण होत असल्याचे पाहून श्याम टॉवरवरून खाली उतरला आणि आॅटोरिक्षा करून थेट अतिक्रमित शेताची मोजणी सुरू होती. त्या ठिकाणी पोहोचला. यावेळी तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, भूमिअभिलेखचे तालुका निरीक्षक डी.आर. गोसावी, सैय्यद, तलाठी नारायण हागोणे, प्रवीण दुधे, ग्रामसेवक तायडे, रेणुका बावणे, सरपंच निर्मला धनसावत, पोलीस पाटील ओम खोडे, ग्रामपंचायत सदस्य देविदास गव्हाणे उपस्थित होते.
पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवरून श्याम खाली उतरल्याने पोलिसांसोबत प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला. आता श्यामवर पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)